किनवट (नांदेड) : वाघदरी या गावाचा खडतर वाटेचा वनवास अखेर संपला. ७० वर्षांनंतर मतदान केंद्र दिल्याने वागदरीच्या मतदारांची पायपीट थांबली आणि गावातच मतदान करण्याचा योग आला. २० नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजेपर्यंत इथे ७२.३१ टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.
जंगलातून १० किलोमीटर पायपीट करीत मतदानाचा हक्क बजावणाऱ्या वाघदरीवासीयांचा नवीन मतदान केंद्र दिल्याने सोयीचे झाले. येथे एकूण १८१ मतदार असून, ७२ पुरुष व ५७ स्त्रिया अशा १२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तब्बल ७० वर्षांनंतर गावांतच मतदान करणाऱ्या मतदारांचा आनंद द्विगुणित झाला. सहा. जिल्हाधिकारी कावली मेघना यांनी वाघदरी येथे स्वतंत्र नवीन मतदान केंद्र दिल्याने गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहे. याच वाघदरीला लागून असलेल्या मांजरीमाथा येथे मतदान केंद्र देऊन त्यांची ही परवड दूर करण्याची मागणी होत आहे.
खडतर वाटेने मतदान केंद्रावर ट्रॅक्टरने पोहोचले कर्मचारी अन् साहित्यखडतर वाटेने जंगलातून १० किलोमीटर पायपीट करत मतदानाचा हक्क बजावणाऱ्या वाघदरीवासीयांचा नवीन मतदान केंद्र निर्माण केल्याने पांग फिटला आहे. किनवट मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी मंगळवारी डोंगर माथ्यावरील वाघदरी येथील मतदान केंद्रावर नियंत्रण युनिट, बॅलेट युनिट, मतदान यंत्र व कर्मचाऱ्यांना चक्क ट्रॅक्टरने नेण्यात आले आहे.
लोकसभेला पायपीट, विधानसभेला गावात मतदानवाघदरी ही वस्ती कुपटी (खु.) ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येते. ग्रामपंचायतीचे मतदान करण्यासाठी कुपटी येथे जावे लागत होते, तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा या निवडणुकीसाठी जलधरा येथे दगड-धोंडे तुडवत खडतर रस्त्याने वाट शोधण्याची वेळ येत होती. त्यानंतर कुठे मतदान करावे लागायचे. कोणी पायी, तर कोणी ट्रॅक्टरने मतदान केंद्रावर जायचे. वाघदरी ही वस्ती महाराष्ट्राच्या नकाशावर नव्हती. लोकसभा निवडणुकीत पायी व ट्रॅक्टरने मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जाणाऱ्या मतदारांची व्यथा लोकमतने २८ एप्रिलच्या अंकात ''खडतर वाटेने पायपीट करत बजावला मतदानाचा हक्क'' या मथळ्याखाली मांडली होती.
वाघदरीवासीयांची झाली सुटका२१ सप्टेंबर रोजी किनवटच्या सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कावली मेघना यांनी या ठिकाणी भेट देऊन मतदान केंद्राचा प्रस्ताव पाठवला, असे गावकऱ्यांना सांगितले होते. अखेर विधानसभेच्या निवडणुकीत वाघदरी येथे नवीन मतदान केंद्र दिले. मतदान केंद्रावर चक्क ट्रॅक्टरने सर्व साहित्य घेऊन कर्मचारी खडतर वाटेने वाघदरी येथे पोहोचले. मतदान केंद्र दिल्याने हिंस्र प्राण्यांच्या तावडीतून वाघदरीवासीयांची सुटका झाली आहे.