लोहा (जि. नांदेड) : तालुक्यातील हळदव येथील बारावीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनीने बदनामी झाल्याच्या तणावातून मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता गळफास लावून जीवनयात्रा संपविली. या प्रकरणात याआधीच राहुल सदाशिव बडवणे (२२, रा. पिंपळगाव कोरका, ता. जि. नांदेड) याच्याविरुद्ध पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्याला अटकही झाली आहे.
२१ जानेवारी रोजी हळदव येथील साडेसतरा वर्षे वयाची निर्भया (नाव बदलले आहे) राहुल बडवणे याच्या सांगण्यावरून शिकवणीला जाते म्हणून घराबाहेर पडली व प्रवासी वाहनाने नांदेड येथे गेली. राहुलने मोबाईल फोनवरून अगोदरच निर्भयास तुला नोकरी मिळवून देतो, अशी फूस लावली होती. त्याच्या बोलण्यावर निर्भयाने विश्वास ठेवला आणि घर सोडले. इकडे घरच्यांनी आणि नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध करूनही तिचा पत्ता लागला नाही. २१ रोजी सायंकाळी निर्भयाच्या कुटुंबाने नातेवाईकांसह लोहा पोलीस ठाण्यात धाव घेत मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली.
लोहा पोलिसांनी मुलीच्या मोबाईलचे टॉवर लोकेशन तपासले असता नांदेड येथील शिवाजीनगर दिसून आले. पोलीस पथक तात्काळ नांदेडला रवाना झाले. मात्र तिचा मोबाईल बंद असल्याने तपास पुढे सरकला नाही. दुसऱ्या दिवशी मुलीनेच घरच्या मंडळीस फोन करून मी नांदेड बसस्थानकात असल्याचे सांगितले. तेथून तिला परत आणण्यात आले. तिने लोहा पोलिसांत मला नोकरीचे आमिष दाखवून नांदेडला बोलावून घेतले व त्याच्या सांगण्यावरूनच मी मोबाईल करून घरच्यांना खोटी माहिती दिली, असा बयान दिला. यानंतर राहुल बडवणे यास २५ रोजी अटक करण्यात आली़ त्याच्याविरुद्ध पोस्कोअंतर्गत कलम ८ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. तसेच अन्य एक अल्पवयीन आरोपी आहे.
निर्भयाचे स्वप्न अधुरेनिर्भया ही हँडबॉल या क्रीडा प्रकारात निष्णात होती. तिला यातच करिअर करायचे होते. घरच्या मंडळींकडून लग्नाचा विचार होत होता. आता आपले स्वप्न पूर्ण होणार नाही, अशी भावना तिच्या मनात निर्माण झाली. दरम्यानच्या काळात मोबाईलच्या माध्यमातून ती राहुलच्या संपर्कात आली. घर सोडल्यानंतर पहिल्याच दिवशी भ्रमनिरास झाल्याने दुसऱ्याच दिवशी तिने घरच्यांना फोन केला. घरी परत आलेल्या निर्भयाने बदनामीच्या तणावात स्वत:ला संपविले.