महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, गुजरात, केरळ आणि मध्यप्रदेश राज्यातून राजस्थानमधील कोणत्याही रेल्वे स्थानकावर उतरण्यापूर्वी ७२ तासांच्या आतील आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असणे आवश्यक असल्याचे प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक, उत्तर पश्चिम रेल्वेने एका पत्राद्वारे राजस्थान सरकारचा हवाला देवून कळविले आहे.
राजस्थानमध्ये जाणाऱ्या सर्व रेल्वे प्रवाशांना आता राजस्थानमधील कोणत्याही स्थानकावर उतरायचे असेल तर त्यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. जर अहवाल पॉझिटीव्ह असेल तर तो प्रवाशी प्रवास करू शकणार नाही. राजस्थानमधील कोणत्याही स्थानकावर उतरण्याच्या ७२ तासांच्या आतील आर.टी.पी.सी.आर. निगेटिव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे आवश्यक आहे.
आरटीपीसीआर रिपोर्टचा गोंधळ
नांदेड शहरातील आरटीपीसीआरद्वारे कोरोना तपासणी करणार्या रूग्णांना चार ते पाच दिवस रिपोर्ट मिळण्यासाठी लागत आहे. त्यामुळे नांदेडातून राजस्थानला जाणार्या व्यक्तींना ७२ तासात राजस्थानमधील स्थानकावर पोहोचणे कसे शक्य होईल, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे कोरोना तपासणीचा गोंधळ मिटवून रिपाेर्ट २४ तासात देणे बंधनकारक करणे गरजेचे आहे. अन्यथा परराज्यात प्रवास करणार्या नागरिकांची, परप्रांतीय मजूरांची मोठी अडचण निर्माण होवू शकते.