- युसूफमियाँ नदाफ ( पार्डी, जि. नांदेड )
अर्धापूर तालुक्यातील देळूब (बु.) गावाच्या शिवारात पाणी चांगले असून पूर्वी या गावात केळी, ऊस, हळद पीक मोठ्या प्रमाणात घेतले जायचे़ मात्र केळीवर येणारे रोग, गारपीट, वादळी वाऱ्यामुळे होणारे नुकसान तसेच उसाला लागणारे जास्तीचे पाणी, दरामधील तफावत, वाढता खर्च याला कंटाळून येथील एका युवा शेतकऱ्याने या दोन्हीही पिकांना काबुली हरभऱ्याचा पारंपरिक पर्याय निवडला आहे. याद्वारे उत्पन्नात पूर्वीपेक्षा भरघोस वाढ करण्यात या युवा शेतकऱ्याला यश मिळाले आहे.
तालुक्यात पाण्याची चांगली उपलब्धता असल्याने देळूब येथील युवा शेतकरी नूरखान युसूफजई पठाण यांनी मोठ्या प्रमाणावर काबुली हरभऱ्याची पेरणी केली आहे, ते अगोदर मोठ्या क्षेत्रावर केळी व ऊस घ्यायचे. अलीकडील काही वर्षांपासून सोयाबीन व मुख्य म्हणजे काबुली हरभरा पीक घेऊन त्यांनी शेतीची आर्थिक परिस्थिती बदलली आहे. गेल्या काही वर्षांपासून ४० ते ५० एकरावर काबुली हरभऱ्याची पेरणी करून त्याचे सुयोग्य व्यवस्थापन करून हे पीक यशस्वी केले आहे. केळी पूर्णपणे थांबवून उसाची लागवड कमी करून काबुली हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात क्षेत्रात वाढ केली आहे
नूरखान युसूफजई पठाण यांची संयुक्त कुटुंबाची सुमारे ५० एकर जमीन असून, ते केळी व ऊस पीक घेत होते. मात्र, या पिकाच्या समस्यांमुळे ते कमी करून कमी कालावधीतील सोयाबीन व हरभरा या पारंपरिक हंगामी पिकांकडे ते वळले. खरिपातील सोयाबीन काढल्यानंतर लगेच काबुली हरभरा पेरला. हे त्यांचे सातवे वर्षे आहे. हा हरभरा या परिसरात आणला तो त्यांनीच. पहिल्या वर्षी त्यांनी फक्त सहा एकरवर तो घेतला. त्याचे मिळणारे उत्पन्न व दर लक्षात घेऊन पुढील वर्षी जास्त क्षेत्र वाढवीत नेले़
हरभऱ्याला थंडी चांगली मानवत असल्याने लवकरच पेरणीला सुरुवात करावी लागते़ जमीन भारी सुपीक व कसदार असावी. एकरी सुमारे ५५ किलो बियाणे लागते. दरवर्षी बियाणात बदल करावा.बियाण्यांवर रासायनिक बीज प्रक्रिया केल्यामुळे बियाणे बाद होण्याची शक्यता कमी असते. काबुली हरभऱ्याची पेरणी ट्रॅक्टरच्या साह्याने केली जाते. त्याच वेळी खताची पेरणी करावी. पेरणीच्या वेळी डीएपी खताचा वापर करावा तर पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी युरिया व पालाश खत दिला जातो.
पहिले पाणी पेरणीच्या वेळी, तर दुसरे २२ ते २५ दिवसांनी दिले जाते. त्यानंतर २५ दिवसांच्या अंतराने दोन सिंचन केले जातात. हरभऱ्याला कमी पाणी लागत असल्याने तुषार संच फक्त चार तास चालवावा. काबुली हरभऱ्याचे घाटे एकदम टपोरे असतात. सुमारे चार वेळा तरी कीडनाशकाची फवारणी करावी लागते. गेल्या वर्षात ५० एकरमध्ये ७०० क्विंटल काबुली हरभरा झाला होता. त्याला ५४०० रुपये भाव मिळाला होता. हा भाव कमी मिळाला असला तरी खर्च व कमी कष्टामुळे तो परवडल्याचे पठाण यांनी सांगितले.