नांदेड: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरूणीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अखेर २८ फेब्रुवारी रोजी पहाटे बळीरामपूर येथील एका आरोपी तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिडको वसाहतीशेजारी एका २३ वर्षीय तरूणीसोबत लग्न करण्याचे आमिष दाखवून बळीरामपूर येथील आरोपी तरूण नितीन केशवराव डोंगरे याने उपरोल्लेखित तरूणीला विश्वासात घेतले. दरम्यान, आरोपी नितीन डोंगरे याने गेल्या दोन वर्षांपासून उपरोक्त तरूणीस लग्न करण्याचे आमिष दाखवून ठिकठिकाणी वारंवार अत्याचार केला.
आरोपी नितीन डोंगरे एवढ्यावरच थांबला नसून, त्याने आपल्या पोटावर लाथाबुक्याने जबर मारहाण करुन आपणास गर्भपात करण्यास भाग पाडले असल्याचा आरोप पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस ठाणे अंमलदार ज्ञानोबा गिते व मदतनीस पो. कॉ. विश्वनाथ पवार यांनी दिली. आरोपी तरूणाने तू जर मला लग्न कर म्हणून जबरदस्ती करशील व पोलीस ठाण्याला गेलीस, तर तुला पिस्तोलने गोळ्या घालून खतम करतो, असे म्हणून आपणास जिवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी नांदेड ग्रामीण ठाण्यात २८ फेब्रुवारी रोजी पहाटे आरोपी नितीन केशव डोंगरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले, पोलीस कॉन्स्टेबल शंकर पुरमवार तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल रागिणी सूर्यवंशी हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.