नांदेड: वर्कशॉपमध्ये काम करताना शॉक लागून एका ३८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना २१ मार्च रोजी सकाळी नांदेडच्या 'सिडको' वसाहतीशेजारील विठ्ठल नगर परिसरात उघडकीस आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड ते उस्मान नगर मुख्य रस्त्यावरील 'हडको' परिसरातील विठ्ठल नगर येथील मनजीतसिंघ टर्नर यांचे नांदेड ते उस्मान नगर जाणाऱ्या रस्त्यावर वर्कशॉप आहे. मनजीतसिंघ टर्नर हे नेहमीप्रमाणेच २० मार्च रोजी वर्कशॉपमध्ये कामाला गेले व रात्री घरी परत आले नाहीत. दरम्यान, मनजीतसिंघ यांच्या मातोश्री जगनकौर टर्नर या २१ मार्च रोजी सकाळी त्यांच्या वर्कशॉपमध्ये जावून पाहिले असता, मनजीतसिंघ टर्नर हे त्याठिकाणी बेशुद्ध अवस्थेत दिसले.
त्याचवेळी, त्यांच्या तोंडातून रक्त निघत असल्याचे दिसले. तदनंतर जगनकौर टर्नर यांनी या घटनेची माहिती त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना सांगितली. दरम्यान, नातेवाईक घटनास्थळी जावून पाहिले असता, तेथे मनजीतसिंघ टर्नर हे २१ मार्च रोजी सकाळी सहा वाजेपुर्वीच विजेचा शॉक लागून मरण पावले असल्याचे सर्वांच्या निदर्शनास आले, अशी माहिती पोलीस ठाणे अंमलदार प्रविण केंद्रे यांनी दिली. या घटनेची माहिती समजताच पोउपनि. माणिक हंबर्डे व बीट अंमलदार शेख जावेद हे घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
याप्रकरणी गुरूबच्चनसिंघ टहलसिंघ सिध्दू (रा. शिव साईनगर, तरोडा, नांदेड) यांनी दिलेल्या माहितीच्याआधारे नांदेड ग्रामीण ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. प्रभारी पो.नि. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल शेख जावेद याप्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.