नांदेड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पूर्णा तालुक्यातील सौराते आलेगाव येथील 24 वर्षीय तरुणाने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील आलेगाव सौराते येथील प्रशांत विश्वनाथ सौराते (वय 24) यांनी मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करीत बुधवारी रात्री तणनाशक विष प्राशन केले. दरम्यान प्रशांत यांचे मोठे बंधू संतोष यांनी त्यास तात्काळ उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉ. रंजन दासे यांनी सांगितले.
प्रशांत हा मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रिय सहभागी होता, बुधवारी पहाटेपासून तो मी काकासाहेबसारख समाजासाठी जीव देणार असल्याचे म्हणत होता ,आम्ही त्याला समजून सांगून देखील रात्री उशिरा शेतात जाऊन तणनाशक पिले, त्याच्या या परिस्थितीला शासन जबाबदार असल्याची प्रतिक्रिया प्रशांत यांचे मोठे भाऊ संतोष सौराते यांनी दिली.
सरकार मराठा आरक्षणावर सकारात्मक असेल तर आमच्या निष्पाप भावाचे बळी का घेत आहे. प्रशांत हा चळवळीतला कार्यकर्ता असून अशा घटनांमुळे कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होत आहे. त्यातुनच युवक शेवटच्या टोकाचे पाऊल उचलत असून ही बाब सरकारने गांभीर्याने घ्यावी. प्रशांतच्या या परिस्थितीला मुख्यमंत्री जबाबदार असून त्याच्या जीविताची हानी झाल्यास मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार राहतील, अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांनी दिली.
दरम्यान, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, छावाचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव काळे, राजेश मोरे, दशरथ कपाटे, भाजपचे महानगराध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधव देवसरकर, अविनाश कदम, कृषी परिषदेचे उपाध्यक्ष भागवत देवसरकर, स्वप्नील पाटील, शैलेश कदम, मोहन शिंदे आदींनी रुग्णालयास भेट देऊन प्रशांतच्या प्रकृतीची विचारपूस केली.