नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा यावर्षीचा आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव ‘वसुंधरा-२०१७’ विष्णूपुरी येथील ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयात २३ ते २६ सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. ही माहिती विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ़ राजेश्वर दुडूकनाळे यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली़ महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक व अभिनेते योगेश शिरसाठ यांच्या हस्ते २३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे़ अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ़ पंडित विद्यासागर राहणार आहेत. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, प्र- कुलगुरू डॉ़ गणेशचंद्र शिंदे, संतबाबा बलविंदरसिंघजी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे़ स्वागताध्यक्ष ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय पवार, प्राचार्य डॉ़ विजय पवार हे आहेत़ २३ सप्टेंबर रोजी सकाळी सोडसात वाजता ‘जागर लोकशाही मूल्यांचा’ या विषयावर शोभायात्रा निघणार आहे़ साडेदहा वाजता उद्घाटन समारंभानंतर विविध कला प्रकारांचे सादरीकरण केले जाणार आहे़ एकूण पाच मंचांवर संगीत, नृत्य, नाट्य, वाड़्मयीन, ललित कला आणि महाराष्ट्राची लोककला या कला प्रकारातील कलेचे सादरीकरण होणार आहे़ मंचाना भारतरत्न डॉ़ ए़ पी़ जे़ अब्दुल कलाम, निळू फुले, पद्मश्री मोहमंद रफी, कॉ़ गोविंद पानसरे मंच व रवींद्रनाथ टागोर यांची नावे देण्यात आली आहेत़ विविध २८ कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहे़
स्पर्धक व प्रशिक्षक, व्यवस्थापक यांना उत्कृष्ट सुविधा देण्यासाठी ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाने विविध समित्यांचे गठन केले आहे़ महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा २६ सप्टेंबर रोजी होणार आहे़ यावेळी कुलगुरू डॉ़ पंडित विद्यासागर, महाराष्ट्र राज्य मॉडेल व्हीलेज प्रोग्रामचे कार्यकारी संचालक पोपटराव पवार, डॉ़ महेश शिवणकर, ज्येष्ठ कवी प्रा़ लक्ष्मीकांत तांबोळी यांची उपस्थिती राहणार आहे़ पत्रपरिषदेस प्राचार्य डॉ़ विजय पवार, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अशोक कदम यांची उपस्थिती होती.