नांदेड - कोरोनामुळे तब्बल दोन वर्षानंतर यंदा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा युवक महोत्सव होणार आहे. नांदेडातील ग्रामीण टेक्निकल ॲण्ड मॅनेजमेंट कॅम्पस याठिकाणी ७ ते १० ऑक्टोबर दरम्यान हा महोत्सव होणार असून त्याला राष्ट्रचेतना असे नाव देण्यात आले आहे. महाविद्यालयांना त्यासाठी ११ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव पाठवावे लागणार आहेत.
कोरोनामुळे तब्बल दोन वर्ष युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले नव्हते. यंदा सर्व निर्बंध हटविल्यामुळे धुमधडाक्यात हा महोत्सव साजरा होणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सल्लागार समितीच्या बैठकीत आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवासाठी आझादी का अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘ राष्ट्रचेतना २०२२ ’ असे समर्पक नाव देण्यात आले आहे.
या महोत्सवामध्ये एकूण २८ कला प्रकारांचे सादरीकरण होणार असून, नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली या विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, कलावंत यामध्ये सहभागी होणार आहेत. विद्यार्थी कलावंतांसाठी युवक महोत्सव हे हक्काचं कलापीठ असते. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिकाधिक वाव मिळावा व उत्साही वातावरणात हा महोत्सव पार पडावा त्या दृष्टीने सर्वच महाविद्यालयांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव व आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय पवार यांनी केले आहे.
लढा स्वातंत्र्याचा, गाथा बलिदानाचीयुवक महोत्सवासाठी शोभायात्रेचा विषय ‘ लढा स्वातंत्र्याचा... गाथा बलिदानाची ’ हा ठेवण्यात आलेला असून, वक्तृत्व स्पर्धेसाठी स्वातंत्र्याची ७५ वर्ष : काय कमावले ? काय गमावले ? , संस्काराविना शिक्षण विनाशाचे लक्षण, कैफियत शेतकऱ्याची हे तीन विषय ठेवलेले आहेत. वादविवाद स्पर्धेसाठी ‘ आजची प्रसार माध्यमे सामान्यांचा आवाज बनली आहेत / नाहीत . ’ हा विषय आहे.