अर्धापूर ( नांदेड ) :- भरधाव कारने चिरडल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना आज ( दि.२३ ) सकाळी दाभड (भोकर फाटा) पासून १०० मिटर अंतरावर घडली. मोहम्मद रमजान मोहम्मद सरीफ ( ३१ ) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मोहम्मद रमजान मोहम्मद सरीफ यांचे भोकर फाटा येथे पंचर दुरुस्तीचे दुकान आहे. आज सकाळी ते नेहमीप्रमाणे दुकानावर जात होते. यावेळी नांदेड - भोकर रस्त्यावर दाभड (भोकर फाटा) पासून १०० मिटर अंतरावर साईबाबा मंदिरासमोर एका भरधाव कारने ( एम.एच २२ ए.एम.८६४४ )त्यांना चिरडले. यानंतर अनियंत्रित झालेली कार बाजूच्या खड्ड्यात जाऊन कोसळली. या अपघातात मोहम्मद यांचा जागीच मृत्यू झाला. ते बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यातील केलाजलालपुर येथील मुळचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात आई-वडिल,भाऊ, पत्नी-मुलगा असा परिवार आहे.
हेही वाचा - औरंगाबादमध्ये ऑनर किलिंग ? वडिलांनीच खड्डा खोदून पुरला मुलीचा मृतदेह
अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अरूण केंद्रे, पोउनी ज्ञानेश्वर बसवंते व पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण किशनराव मांगुळकर, जमादार शेख मजाज, श्रीराम कदम, मदतनीस वसंत सिनगारे, ईकबाल शेख, प्रभाकर कर्डेवाड, राजकुमार व्यवहारे आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
हेही वाचा - गौरवास्पद ! नांदेडचे भूमिपुत्र विवेक चौधरी यांची वायुसेना प्रमुख पदावर वर्णी
दरम्यान, गाडीत तीन ते चार असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. अपघातानंतर त्यातील सर्वांनी बाहेर येत पळ काढला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
हेही वाचा - शिवणगावजवळ मालगाडीचे डबे रुळावरून उतरले; प्रवासी रेल्वे वाहतूक खोळंबली