किनवट : किनवट शहरातील जफारखान नगरवासीयांच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नसल्याने तो मार्गी लावावा, ही मागणी घेऊन पुन्हा महिला-पुरुषांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर २८ डिसेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा सहावा दिवस असूनही कोणीही लक्ष द्यायला तयार नाही, अशी खंत व्यक्त केली आहे.
रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा म्हणून यापूर्वी ११ डिसेंबर २०२० रोजी उपोषणाला महिला-पुरुष बसले होते; पण नगर परिषदेने सदरील अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात येईल व संबंधित अधिनियमाच्या तरतुदी अन्वये गुन्हा नोंद करण्यात येईल. उपोषण मागे घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे लेखी पत्र दिल्याने उपोषण मागे घेतले होते. पण रस्ता मोकळा केलेला नसल्याने हा रस्ता मोकळा करून देण्याची मागणी घेऊन नसरीन असिफ खान, उशारेड्डी दयकलवार, रिजवान अकबर, विठ्ठल कावळे, शिवनंदा स्वामी, मंगल कावळे, सुनीता सुभाष, गोदावरी, पार्वती शंकर, नगमा शे खदिर, शकुंतलाबाई आदींनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर २८ डिसेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. मावळत्या वर्षात सुरू केलेले आमरण उपोषण नवीन वर्षात सुरू आहे. उपोषणाचा आजचा सहावा दिवस असतानाही इकडे कोणी लक्ष द्यायला तयार नसल्याने अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे व संबंधितांचे साटेलोटे तर नाही ना? उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या कोणत्याही अधिका-याने उपोषणस्थळाला भेट दिली नाही. उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली असतानाही कोणी लक्ष द्यायला तयार नसल्याची खंत उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली. जोपर्यंत रस्त्याचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. मेलो तरी चालेल, असे उपोषणकर्त्यांनी बोलून दाखविले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ‘प्रशासन आपल्या गावी’ हा उपक्रम राबवून समस्या सोडण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. इथे मात्र प्रशासनाचा एकही अधिकारी उपोषणकर्त्याला बोलायला तयार नाही. याबाबत सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.