लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरानजीक गोपाळचावडी भागात दुचाकीवरुन येणाऱ्या गोविंद काळे याचा टेम्पोवर आदळून मृत्यू झाला होता़ या प्रकरणात पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला होता़ विटांची वाहतूक करणा-या टेम्पोचालकाने निष्काळजीपणाने धोकादायक पद्धतीने हा टेम्पो रस्त्यात उभा केला होता़ या टेम्पोचालकाच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत़कौठा भागातील गोविंद काळे हे १७ मे रोजी सासुरवाडीला पत्नीला सोडून दुचाकीवरुन नांदेडकडे येत होते़ परंतु, रात्री ते घरी परत आलेच नाहीत़ दुस-या दिवशी सकाळी तुप्पा शिवारात त्यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला़ प्रथमदर्शिनी व्यवसायाच्या वादातून त्यांचा खून करण्यात आल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता़ या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला होता़ दरम्यान, या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि विनोद दिघोरे यांच्याकडे देण्यात आला़ अतिशय कीचकट असलेल्या या प्रकरणात कुठलाही पुरावा नव्हता़ त्यानंतरही ‘स्थागुशा’चे दिघोरे यांनी नियोजनबद्ध तपास करीत या प्रकरणाचा गुंता सोडविला़ तुप्पा येथील टेम्पोचालक काजी अकबर काजी बाबर (वय २२) हा विटांची वाहतूक करतो़ १७ आॅगस्टच्या रात्री सोबतच्या मजुराला लघुशंका आल्यामुळे काजी अकबर याने तुप्पा शिवारात रस्त्याच्या कडेला धोकादायक पद्धतीने टेम्पो उभा केला. त्याचवेळी दुचाकीवरुन येणा-या गोविंद काळे हे टेम्पो न दिसल्यामुळे त्यावर धडकून गळा चिरल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला़ घटनेनंतर आरोपी काजी अकबर हा टेम्पो घेऊन फरार झाला होता़ स्थागुशाने त्याच्या मुसक्या आवळल्या़ पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, पोनि़राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विनोद दिघोरे, सदानंद वाघमारे, कल्याण नेहरकर, जसवंतसिंग साहू, जांभळीकर, राजू पांगरीकर, बालाजी सातपुते, तानाजी येळगे, जावेद, परदेशी, टाक, श्रीरामे यांनी ही कारवाई केली़---
- जिल्ह्यातील अर्धापूर, विमानतळ आणि मुदखेड ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या तीन खून प्रकरणांसह नांदेड ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील काळे प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला़ यामध्ये सपोनि विनोद दिघोरे यांची भूमिका महत्त्वाची आहे़