जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा १७ मार्च २०२१ रोजी सभागृहात घेण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. परिणामी दोन सभा ह्या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. मात्र कोरोनाचे संकट आता कमी होत असल्याने १६ जून रोजी सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. सभेच्या प्रारंभीच सत्ताधारी व विरोधक सदस्यांनी एकत्र येत जिल्हा परिषद, बांधकाम विभागाची विभागणी करुन नांदेड विभाग पंतप्रधान ग्राम सडक योजनेशी जोडल्याचा तीव्र निषेध केला. सभागृहात या निषेधाचे फलकही लावण्यात आले. सदर विषयात जि.प. सदस्य साहेबराव धनगे, समाधान जाधव, गंगाप्रसाद काकडे, मनोहर शिंदे, बबन बारसे, दशरथ लोहबंदे, माणिक लोहगावे, चंद्रसेन पाटील आदींनी या निर्णयामुळे बांधकाम विभागाचा कारभार ठप्प होईल, अशी टीका केली. भोकर व देगलूर येथे नवे कार्यालय स्थापन करण्यात आले. येथे जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत कार्यकारी अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र नांदेड कार्यालयाचा भार हा पंतप्रधान ग्रामसडक योजनेशी जोडण्यात आला. या अधिकाऱ्याकडे नांदेडसह बीडचाही पदभार आहे. त्यामुळे कामकाजाचा खोळंबा होईल, अशी टीका करण्यात आली. या निर्णयाचा निषेध करण्यात आला. त्याचवेळी माणिक लोहगावे, चंद्रसेन पाटील आदींनी बांधकाम विभागाचे विभाजन करण्याचा निर्णयच चुकीचा असल्याचे सांगितले. हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
सभा सुरू असताना सभागृहातील उकाड्याने सदस्य संतप्त झाले. या विषयाला काँग्रेसचेच धनगे, मनोहर शिंदे यांनी वाचा फोडली. त्यांना बबन बारसे, समाधान जाधव, पूनम पवार, माजी सभापती मिसाळे यांनी पाठिंबा दिला. सभागृहावर कोट्यवधी रुपये खर्च करुनही ही अवस्था असेल तर कोट्यवधी रुपये गेले कुठे? असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. सभागृहात प्रचंड उकाडा जाणवत असून ही सभा तहकूब करावी, अशी मागणीही केली. त्यावेळी अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर १५ मिनिटात अतिरिक्त पंख्याची व्यवस्था करण्यात येईल, असे सांगितले. केवळ उकाड्यामुळे सभा तहकूब करावी हे उचित ठरणार नसल्याचे स्पष्ट केले, त्याचवेळी या कारणासाठी सभा तहकूब होत असेल तर सर्व विषय मंजूर केले जातील. त्यानंतरच सभा तहकूब होईल, असेही वक्तव्य केले. या वक्तव्याला गटनेते प्रकाश भोसीकर, लोहगावे, बारसे यांनी आक्षेप घेतला. आपणच विषय मंजूर करणार असाल तर सभा घेतली कशाला? असा प्रश्न उपस्थित केला. या विषयावरुन गोंधळाला सुरुवात झाली. त्यातच पूनम पवार यांनी सभागृहात सदस्यांचे उकाड्याने हाल होत असताना काही पदाधिकारी मात्र अल्पोपहार करीत आहेत, असे वक्तव्य केले. त्यावर सभापती संजय बेळगे संतप्त झाले. कोणाच्या खाण्यावर सभागृहात बोट ठेवणे ही बाब संयुक्तिक नसल्याचे ते म्हणाले. सर्वांसाठी सभागृहाने अल्पोपहार दिला होता. आपल्याला मधुमेह असून वेळेवर खावे लागते, असा खुलासाही दिला. त्यानंतर हा विषय बंद झाला. मात्र उकाड्याचा त्रास होत असल्याने सदस्य सभा तहकूब करण्याच्या मागणीवर ठाम होते. अखेर अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांनी सभा तहकूब केल्याची घोषणा केली. यावेळी उपाध्यक्षा पद्मा सतपलवार, सभापती बाळासाहेब रावणगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे आदींची उपस्थिती होती.
चौकट--------
सभागृहात न बोलणाऱ्यांची नोंद
बुधवारी झालेल्या सभेत ५ मार्च आणि १७ मार्च रोजी झालेल्या सभेचे अहवाल देण्यात आले होते. या अहवालात आपण जे मुद्दे मांडले होते त्याची कुठेही नोंद घेतली नाही, असा आक्षेप सदस्य ॲड. विजय धोंडगे यांनी घेतला. विशेष म्हणजे माजी सभापती दत्तू रेड्डी त्या सभेत बोललेले नसतानाही त्यांच्या वक्तव्याची नोंद घेतल्याचे सांगितले. यावेळी दत्तू रेड्डी यांनी आपण त्या सभेत बोललो नव्हतोच, अशी बाबही मान्य केली.