नांदेड : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसह सर्व प्रक्रिया जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या आदेशानुसार पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत रद्द करण्यात आली आहे़ जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे इच्छुक जि़ प़ सदस्यांमध्ये नाराजी पसरली आहे़
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांना प्रारंभी चार महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती़ ही मुदतवाढ २० डिसेंबर रोजी संपली असल्याने नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी होतील, अशी अपेक्षा होती़ या अनुषंगाने अनेक जि़ प़ सदस्यांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डींग लावली होती़ पदाधिकारी निवडीच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने पत्र पाठविले आहे़ या पत्रात २०१९ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.२२, २३ आॅगस्ट २०१९ अन्वये अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची मुदत २० डिसेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम ४२ व ४५ खाली जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक २० डिसेंबरपासून उर्वरित पुढील कालावधीसाठी घेण्याचे आदेश होते़ त्यानुसार अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुका घेण्यासाठी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांची पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्तीही करण्यात आली होती.
मात्र सुधारित शासनपत्रात या आदेशान्वये १२० दिवसांचा कालावधी हा २० डिसेंबर रोजी समाप्त झाला आहे. त्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार आवश्यक ती सूचना नोटीस निर्गमित करुन सदर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांच्या विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापतीच्या निवडणुकीबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना देण्यात आली आहे़ त्यामुळे ३१ डिसेंबर रोजी होणारी जिल्हा परिषद नांदेडच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले़
नियोजनच्या निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्याही रद्दजिल्हा नियोजन समितीवरील तसेच कार्यकारी समितीवरील नामनिर्देशित सदस्य व विशेष निमंत्रित सदस्य यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश शुक्रवारी राज्य शासनाच्या नियोजन विभागाने जारी केले़ या समित्यावर आता नव्याने नियुक्त्या करण्याचे प्रस्तावित असल्याने यापूर्वी शासनाकडून करण्यात आलेल्या सर्व नामनिर्देशित सदस्य व विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या त्वरित प्रभावाने रद्द करण्यात येत असल्याचे याबाबतच्या आदेशात म्हटले आहे़