नांदेड : परदेशात जाऊन शिक्षण घेणे, नोकरी मिळविणे, हे गोरगरिबांच्या स्वप्नातही येत नाही. कारण, आर्थिकदृष्ट्या दुर्बलता, योग्य मार्गदर्शनाचा अभाव आणि आत्मविश्वासाची कमतरता. नेमक्या याच बाबी हेरून नांदेडच्या भूमिपुत्राने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना जगभरातील संधी उपलब्ध करून देण्याचा ‘ग्लोबल महाराष्ट्र’ हा उपक्रम सुरू केला आहे. विदेश सेवा अधिकारी डॉ. सुयश चव्हाण, असे या भूमिपुत्राचे नाव असून, त्यांच्या या उपक्रमात प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील एक हजार शाळांतील विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकविण्यात येत आहे.
डॉ. सुयश चव्हाण हे दिल्लीत विदेश मंत्रालयात आहेत. त्यांनी चार वर्षे जर्मनीमध्ये काम केले आहे. तेथील कामाच्या अनुभवावरून त्यांना जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांसाठी जगाची कवाडे उघडी करण्याची कल्पना सुचली. ग्लोबल महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत निवडलेल्या शाळांमधील ७, ८ आणि ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ठरावीक दिवशी प्रोजेक्टर, टीव्ही किंवा मोबाइलवर गावखेड्यातून जगभरात गेलेले मराठी तरुण मार्गदर्शन करणार आहेत. विविध अडचणींवर या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
विद्यावेतनाचीही सोय जर्मनीला दरवर्षी किमान चार ते पाच लाख परदेशी लोकांची गरज असते. तसेच त्या ठिकाणी शिक्षण मोफत आहे. भारतात बारावी पास अन् जर्मन भाषा येत असलेल्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आयटीआयला प्रवेश घेतल्यास त्यांना विद्यावेतन दिले जाते. आयटीआय झाल्यानंतर लगेच त्यांना गलेलठ्ठ पगाराची नोकरीही मिळते.
या भाषेत रोजगाराच्या संधी अधिक - जर्मनीमध्ये रोजगाराच्या संधी अधिक असून, शिकण्यासाठी जर्मन ही इतर भाषांपेक्षा सोपी आहे. जर्मन अन् मराठी भाषेचे व्याकरण जवळपास सारखेच आहे. जर्मन शिकल्यानंतर रोजगार अन् पुढील शिक्षणासाठी जर्मनीसारख्या देशात जाण्याचे गावखेड्यातील विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. - परदेशात नोकरी करून मिळविलेला पैसा पुन्हा गावातच येऊन त्यामुळे गावाच्या विकासालाही हातभार लागणार आहे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे डाॅ. चव्हाण यांनी सांगितले.