पार्डी : अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील एजाज नदाफ याला २६ जानेवारी २०१८ रोजी भारताचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या हस्ते बालशौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते़ जिल्हा परिषदेनेही त्याचा सत्कार करुन एक घरकुल देण्याचे आश्वासन दिले होते, वर्ष झाले मात्र जिल्हा परिषदतेत अजूनही घरकुल देण्याबाबत अजून कोणत्याही हालचाली सुरु नाहीत.१ फेब्रुवारी २०१८ रोजी जिल्हा परिषद कार्यालयात सर्वसाधारण सभेत त्याला बोलावून त्याचा गौरविण्यात आले़ विशेष म्हणजे त्याला सभेत उपस्थित असलेले पदाधिकारी व अधिकाऱ्यांकडून प्रत्येकी पाचशे रुपये याप्रमाणे गोळा करून ही रक्कम नदाफला देण्यात आली होती़ त्याचप्रमाणे त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार जिल्हा परिषदेच्या शासकीय सेवेत सामावून घेण्याचे आणि एक घरकुल देण्याचा ठरावही घेण्यात आला होता़ परंतु एका वर्षाचा कालावधी झाला तरी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त एजाज नदाफला घरकुल मिळाले नाही़ नदाफ याचे वडील अब्दुल रोफ नदाफ यांनी सांगितले की, मी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे़ पार्डी येथील ग्रामपंचायत सदस्याचा ठराव मंजुरी घेऊन पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठवून देण्यात आले तरी घरकुलाची मंजुरी मिळाली नाही़अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील एजाज नदाफ या मुलाने जिवाची पर्वा न करता बंधाºयात बुडणाºया दोन तरुणींना वाचविले होते़ या धैर्याबद्दल नदाफला राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते़नदाफला राहण्यासाठी व्यवस्थित घर नाही, घर पडके असून वीटमातीत बांधले आह़े अर्ध्यावर झोपडी असून मिळालेली भेटवस्तू चोरी जाण्याची भीती वाटते़ दिल्लीत त्यांना विविध सामाजिक कार्यातून भेटवस्तू मिळाल्या आहेत़ ३० एप्रिल २०१७ रोजी पार्डी या गावाजवळ असलेल्या नदीवरील बंधाºयात पाण्यात कपडे धुण्यासाठी चार तरुणी गेल्या होत्या़ त्यांचा तोल गेल्याने त्या पाण्यात बुडत होत्या़ त्यावेळी एजाज नदाफ हा जिवाची पर्वा न करता दोन मुलींचे प्राण वाचविले होते़ त्याने केलेल्या शौर्याबद्दल त्याला राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्याकडून राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार देण्यात आला होता.
नदाफला घरकुल देण्याचे जि.प.चे आश्वासन हवेतच विरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:23 AM