लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी समाजातील लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या डिझेल इंजिन व घरगुती गॅस युनिट वाटप योजनेत १२ कोटी ९४ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी एक अधिकारी व कर्मचारी यांच्यासह ठेकेदार व संस्थेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिवासी विकास विभागाच्या प्रादेशिक व्यवस्थापकांनी ही फिर्याद बुधवारी रात्री उशीरा दिली.संभाजी राघो कोळपे (तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक), रा.बोराडी, ता.शिरपूर, गोकुळ रतन बागुल (वीजतंत्री) रा.शेवगे, ता.साक्री, आकाशदिप विद्युत काममगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष अरुण शिवलाल कोकणी व उपाध्यक्ष गिरीश उदेसिंग परदेशी रा.नंदुरबार अशी संशयीतांची नावे आहेत.सन २००४ ते २००९ या कालावधीतील आदिवासी विकास विभागातील भ्रष्टाचार व गैरव्यवहार पुन्हा गाजतो आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई सुरू झाली आहे. आता थेट गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या नंदुरबार प्रादेशिक कार्यालयात देखील कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. त्याच अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रादेशिक व्यवस्थापक सोपान संतोष संबारे यांनी फिर्याद दिली आहे. सन २००४ ते २००९ या कालावधीत नंदुरबार येथील आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना देण्यात येणाºया तेलपंप अर्थात डिझेल इंजिन पुरवठ्यात आणि वाटपात १२ कोटी १० लाख तीन हजार २४४ रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. याशिवाय घरगुती गॅस युनिट वाटपात व पुरवठ्यात ८३ लाख ९७ हजार रुपयांचा रुपयांचा अपहार केला आहे. दोन्ही योजनेत या चौघांनी तब्बल १२ कोटी १० लाख तीन हजार २४४ रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याचा आरोप या फिर्यादीत करण्यात आला आहे.त्यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात फसवणूकीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास आर्थिक गुन्हे शाखेचचे सहायक पोलीस निरिक्षक दिवटे करीत आहे.