लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक लोकप्रतिनिधी मतदारसंघ निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. जिल्ह्यात सहा ठिकाणी नियुक्त केंद्रात सर्वच मतदारांनी हजेरी दिल्याने १०० टक्के मतदान झाले आहे. सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया सुरू होती. यात नंदुरबार, शहादा, धडगाव, तळोदा, नवापूर व अक्कलकुवा येथील मतदान केंद्रांवर १०० टक्के मतदान झाले आहे. शहादा येथे सकाळपासून गर्दी शहादा येथील तहसील कार्यालयात उमेदवार अभिजित पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी येथील मतदान केंद्रावर ४६ मतदार होते. त्यात १८ पुरुष व २८ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने शंभर टक्के मतदान झाले. मतदानासाठी महाविकास आघाडी व भारतीय जनता पक्षाचा मतदारांनी सकाळी आठ पासूनच मतदान केंद्रावर मतदानासाठी यायला सुरुवात केली. सकाळच्या प्रहरात मोठ्या प्रमाणावर मतदान झाले परंतु काही मतदारांनी दुपारी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. केंद्राध्यक्ष म्हणून तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, मतदान अधिकारी म्हणून नायब तहसिलदार राजेंद्र नांदो़डे, कोषागार अव्वल कारकून प्रीतम नागदेवते,क्षेत्रीय अधिकारी म्हणून प्रभारी उपविभागीय अधिकारी शाहुराज मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद बेहरे यांनी काम पाहिले. यावेळी पथकातील सर्वांची प्राथमिक तपासणी कोविडच्या अनुषंगाने करण्यात आली. तसेच मतदारांचीही तपासणी मुख्य प्रवेशद्वारा जवळच करण्यात येत होती. यावेळी सॅनिटायझर,मास्कचा वापर करुन सोशल डिस्टन्सिंग करण्यात आले. प्रभारी पोलीस निरीक्षक एम.रमेश व उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.तळोद्यात बारापर्यंत आटोपलेतळोदा येथील तहसील कार्यालयात तयार केलेल्या मतदान केंद्रात पालिकेतील सत्ताधारी भाजप व कांग्रेस नगरसेवकांनी सोबत जावून मतदान केले. दुपारी बारा वाजेपर्यत सर्व मतदान पार पाडले होते. तळोदा येथे एकूण २७ मतदान होते. सुरुवातीस भाजप नगरसेवक दोन ग्रुप करून एकत्र मतदानास गेले होते. त्यानंतर काँग्रेसच्या नगरसेवकांनी एकत्र जावून मतदान केले. शेवटी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सीमा वळवी व माजी उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी मतदान केले होते. मतदानाची प्रक्रिया तहसीलदार गिरीश वाखारे यांनी पार पाडली. यावेळी पोलीस निरीक्षक नंदलाल पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय चर्चांनाही उधाण आल्याचे चित्र दिसून आले होते.
नंदुरबार : तहसील कार्यालयात तयार करण्यात आलेल्या मतदान केंद्रात एकूए ५५ लोक प्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावला. एकही लोकप्रतिनिधी मतदार गैरहजर नव्हता. दक्षता म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. नंदुरबार पालिकेचे नगरसेवक, पंचायत समिती सभापती व जिल्हा परिषद गटांचे सदस्य यांनी येथे मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवत पसंतीच्या उमेदवाराला काैल दिला. केंद्राध्यक्ष म्हणून तहसीलदार भाऊसाहेब थोरात, मतदान अधिकारी म्हणून शेखर मोरे, दीपक धनगर व एन.डी.गिरासे यांनी काम पाहिले. नंदुरबार नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी सहकारी नगरसेविकांसह तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी यांनी सकाळच्यावेळेत मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला. बहुतांश नगरसेवक हे एकमेकांसोबत येवून मतदान करुन परत गेले होते. दरम्यान धडगाव येथील सर्व २७ मतदारांनी मतदान केले. तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी केंद्राध्यक्ष म्हणून निवडणूक प्रक्रिया पार पाडली. धडगाव तहसील कार्यालयात मतदान कक्ष तयार करण्यात आला होता.
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी नवापूरात सकाळी आठ ते पाच या वेळेत मतदान झाले. नवापूर तहसील कार्यालयामध्ये मतदान केंद्र तयार करण्यात आले होते.सकाळी आठ ते दहा यावेळेत शुन्य टक्के मतदान होते. यादरम्यान केंद्रातील अधिकारी व कर्मचारी हे निवांद बसून होते. परंतू सकाळी दहा ते दुपारी १२ वाजेच्यादरम्यान मतदानाला वेग येवून १०० टक्के मतदान झाले. केंद्राध्यक्ष म्हणून मंदार कुलकर्णी यांनी काम पाहिले. नवापूर तालुक्यातून ३४ जणांनी मतदान केले. शहरातील २२ नगरसेवक, नगराध्यक्ष, १ पंचायत समिती सभापती व १० जिल्हा परिषद सदस्य अशा ३४ लोकप्रतिनिधी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. केंद्राध्यक्ष तहसीलदार मंदार कुलकर्णी, नायब तहसिलदार रमेश कोकणी , एन डी पाटील, एस एस जाधव यांनी कामकाज पाहिले. मतदान शांततेत पार पडावे यासाठी मतदान केंद्राबाहेर पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर व त्यांच्या पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.