लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात रुग्णाच्या अत्यावश्यक वाहतुक सेवेसाठी असलेली १०८ रुग्णवाहिका सेवेबाबत प्रशासनाचीही नाराजी असून त्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांनीही शासनाकडे अभिप्राय कळविला आहे.जिल्ह्यातील लक्कडकोट, ता.शहादा येथील गर्भवती महिलेला वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने तिचा व नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. त्याबाबत आमदारांनी रुग्णवाहिका सेवेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या पार्श्वभुमीवर या रुग्णवाहिका सेवेबाबतचे एकुणच कामकाज चर्चेत आले. यापूर्वी देखील या सेवेबाबत नागरिकाच्या तक्रारी वाढल्या होत्या. रुग्णाने किंवा त्याच्या नातेवाईकांनी फोन केल्यानंतर साधारणत: अर्धा तासात किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत रुग्णवाहिका पोहचणे अपेक्षीत असते. मात्र, अनेकवेळा ही रुग्णवाहिका वेळेवर पोहचत नसल्याच्या तक्रारी आहेत. या रुग्णवाहिकेवर डॉक्टरांची संख्याही कमी आहे.जिल्ह्यात एकुण १०८ सेवेच्या १४ रुग्णवाहिका आहेत. त्या २४तास सेवा देतात. त्यामुळे तीन शिफ्ट मध्ये डॉक्टरही सेवेला असतात. त्यासाठी ४२ डॉक्टर अपेक्षीत असतांना सद्या या सेवेवर केवळ २६ डॉक्टर आहेत. त्यामुळे अनेकवेळा रुग्णवाहिकेत डॉक्टर उपलब्ध होत नसल्याचीही तक्रार आहे. ही सेवा देण्यासाठी बीव्हीजी कंपनीने ठेका घेतला आहे. या संदर्भात सिव्हीलने देखील प्रशासनाकडे सेवेबाबत तक्रारी वाढल्याचे कळविले आहे.१०८ रुग्णवाहिका सेवेबाबत नेहमीच तक्रारी होत असतात. त्यावर डॉक्टरांची संख्या देखील कमी असून या सेवेबाबत नागरिकाचा देखील रोष वाढला आहे. त्यामुळे शासनाकडे देखील आपण तसा अहवाल पाठविला आहे.-डॉ.आर.डी.भोये,जिल्हा शल्य चिकित्सक.या रुग्णवाहिका सेवेसाठी कंपनीने डॉक्टर अपेक्षेप्रमाणे नियुक्त केले होते. परंतु कोरोनाच्या परिस्थितीमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्याने काही डॉक्टरांनी सेवा सोडली आहे. सद्या २६ डॉक्टर असून सेवा सुरळीत सुरू आहे.कुठल्याही तक्रारी नाहीत.-डॉ.निलेश पाटील, जिल्हा व्यवस्थापक, बीव्हीजी कंपनी.
१०८ रुग्णवाहिका सेवेबाबत प्रशासनातही नाराजीचा सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 1:10 PM