लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शासकीय मेडिकल कॉलेजसाठी राज्य शासनाचा १३० कोटी रुपयांचा हिस्सा लवकर मिळावा यासाठी मंत्रीमंडळाच्या येत्या बैठकीत विषय चर्चेला आणणार असल्याची माहिती पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी दिली. यापूर्वीच आपण डीपीडीसीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देत शासकीय जागा देखील उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मेडिकल कॉलेजसाठी एकुण ३२५ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. त्यात केंद्र शासनाचा वाटा ६० टक्यांचा तर राज्य शासनाचा वाटा हा ४० टक्के असतो. केंद्र शासनाने त्यांच्या वाट्याचा १९५ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. आता राज्य शासनाच्या निधीकडे लक्ष लागून आहे. त्याबाबत बोलतांना पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी सांगितले, केंद्र शासनाच्या निधी मिळाल्यानंतर राज्य शासन आपला निधी देते. आता येत्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा विषय चर्चेला आणून आपण निधी मंजुर करून घेणार आहोत. येत्या शैक्षणिक वर्षात कुठल्याही परिस्थितीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे.याआधीच आपण डीपीडीसीच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे.शासकीय जागा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार टोकरतलाव शिवारातील १६.६३ हेक्टर जागा मेडिकल कॉलेजच्या नावावर झाली आहे.कॉलेजसाठी स्थानिक स्तरावर जे काही शक्य असेल त्याची पुर्तता करण्याच्या सुचना आपण वेळोवेळी दिल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जिल्हा रुग्णालयात स्वॅब तपासणीची सोय व्हावी यासाठी आपण गृहमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी मनावर घेत लागलीच टूनॅट मशीन उपलब्ध करून दिली. ही मशीन लवकरच येथे पोहचणार आहे. मंगळवारपासून स्वॅब तपासणीला सुरुवात होणार आहे. दोन महिन्यांपूर्वीच आपण याबाबतचा निर्णय घेतल्याचे अॅड.के.सी.पाडवी यांनी सांगितले.
१३० कोटी रुपये लवकरच मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 12:04 PM