मनोज शेलारनंदुरबार : रनाळे, ता.नंदुरबार येथे मंगळवारी रात्री आयोजित भंडारा-महाप्रसादाच्या कार्यक्रमात अन्नातून विषबाधा झाल्याने दीडशेपेक्षा अधीक जणांना त्रास जाणवू लागला होता. त्यातील १०० पेक्षा अधिक जणांवर उपचार करून लागलीच घरी सोडून देण्यात आले तर ३० जणांवर रनाळे ग्रामिण रुग्णालयात व २५ जणांवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, रनाळे येथे मंगळवारी रात्री बाळूमामा यांच्या नावाने भंडारा-महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी भगर व आमटी व दूधाचा प्रसाद भाविकांना देण्यात आला. महाप्रसाद घेण्यासाठी गावासह परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. रात्री महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर दीड ते दोन वाजेपासून अनेकांना त्रास सुरू झाला. त्यामुळे अनेकांनी रनाळे ग्रामिण रुग्णालयात धाव घेतली. पहाता पहाता दीडशेपेक्षा अधिक रुग्ण दाखल झाले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथक रनाळे ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. लागलीच रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. काही जणांना जास्त त्रास जाणवू लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री २५ जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. रनाळे आरोग्य केंद्रात १०० पेक्षा अधिक जणांवर स्थानिक ठिकाणी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला. तर ३० जणांवर रनाळे येथेच उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नरेश पाडवी यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकाराची चौकशी करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.