रमाकांत पाटील
नंदुरबार : जिल्ह्यातील १८ गावे लम्पी स्कीन संसर्ग बाधीत म्हणून घोषित करण्यात आले असून, या गावातील पाच किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातही लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील दहिंदुले तसेच शहादा तालुक्यातील मंदाणे, तितरी, गणोर. अक्कलकुवा तालुक्यातील ब्रिटिश अंकुशविहीर, रामपूर, वेली, सुरगस. अक्राणी तालुक्यातील केलापाणी, राेषमाळ बुद्रूक, कामोद बुद्रूक, मोख खुर्द, केला खुर्द, काकर्दा व उमरी गव्हाण आणि तळोदा तालुक्यातील तळोदा, लाखापूर फॉरेस्ट, जुवानी फॉरेस्ट येथील जनावरांमध्ये लम्पी स्कीनच्या साथरोगाचा निष्कर्ष होकारार्थी आला आहे. या रोगाचा प्रसार जिल्ह्यातील इतर भागातील जनावरांमध्ये होऊ नये यासाठी रोगप्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार संसर्ग क्षेत्रापासून पाच किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी दिली. या भागातील जनावरांची खरेदी-विक्री, वाहतूक बाजार, जत्रा व प्रदर्शने आयोजित करण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे.