नंदुरबार : राज्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वाढू नये, यासाठी एस. टी. बसेसना ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात धुळे विभागातील ५८४ बसेसना कोटिंग करण्याचे निश्चित करण्यात आले होते. यात नंदुरबार जिल्ह्यातील चार आगारांच्या १८६ बसेसचे कोटिंग पूर्ण झाले असून, दुसऱ्या टप्प्यात सुमारे १५२ बसेसचे कोटिंग करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात नंदुरबार आगारातील बसेसचे कोटिंग करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. याअंतर्गत बसेसची योग्य पद्धतीने स्वच्छता करत नियुक्त केलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पारदर्शी अशी ॲन्टिमायक्रोबियल कोटिंगची प्रक्रिया पूर्ण केली. डोळ्यांना दिसून न येणारे हे कोटिंग प्रवाशांना कोरोनाच्या संसर्गापासून दूर ठेवणार आहे. पहिल्या टप्प्यात काेटिंग करण्यात आलेल्या बसेस विविध मार्गांवर सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. चारही आगारांतून या बसेस शहरातील विविध भागात चालविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोटिंगचा दुसरा टप्पाही लवकर सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
एका बसला दोनवेळा होणार कोटिंग
नंदुरबार आगारात सर्वाधिक वेगाने कोटिंगचे काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. दोन दिवसात सर्व ६९ बसेसचे कोटिंग करण्यात आल्याची माहिती आहे. कोटिंग केलेल्या बसेसना सहा महिन्यांतून दाेनवेळा तर वर्षातून चारवेळा कोटिंग करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील बसेसही विक्रमी वेळेत कोटिंग करण्यात येणार असून, चारही आगारांमध्ये ही कार्यवाही लवकरच सुरु होणार आहे.
बाधित व्यक्ती उठून गेल्यानंतरही धोका होणार नाही
कोटिंग केल्यानंतर एस. टी. बसेसमध्ये कोरोना संसर्गाचा धोका कमी होणार आहे. यातून सुरक्षित प्रवास करणे नागरिकांना शक्य होणार असल्याची माहिती देण्यात आली. बाधित व्यक्तीने प्रवास केल्यानंतरही ही सुविधा असली तरी एखाद्या व्यक्तीच्या बाजूला बाधित व्यक्ती बसला असल्यास प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे मास्कचा वापर सक्तीचा राहणार असल्याने संसर्गाचा धोका कमी होईल, असे एस. टी.कडून सांगण्यात आले. सोमवारी ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग केलेल्या बसेस धावत असल्याचे सांगण्यात आले. धुळे, नाशिक, पुणे, मुंबईसह ग्रामीण भागातही कोटिंग केलेल्या बसेस सोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
एस. टी.ने प्रवास करणे ही गरज आहे. ग्रामीण भागात ही एकमेव सोय आहे. कोटिंग वगैरे काय केली, हे कळले नाही. परंतु एस. टी.च्या हँडल व सीट हँडल स्वच्छ केल्याचे दिसून आले.
- प्रमोद पवार, धानोरा. ता. नंदुरबार.
एस. टी.ने कोटिंगचा चांगला उपक्रम राबवला आहे. या उपक्रमामुळे कोरोनामुक्त प्रवास घडणार आहे. या प्रवासातून संसर्गाचा धोका कमी होणार आहे. कोटिंगमुळे सुरक्षेची हमी आहे.
- वैभव पाटील, नंदुरबार.
पहिल्या टप्प्यात नंदुरबार आगारातील ६९ बसेसचे कोटिंग पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांना कोरोनामुक्त प्रवास करता येणार आहे.
- मनोज पवार, आगारप्रमुख, नंदुरबार.