मनोज शेलार/नंदुरबार
नंदुरबार : जिल्ह्यातील नंदुरबार व तळोदा आदिवासी प्रकल्प अंतर्गत असलेल्या ६७८ गावांची केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आदी आदर्श गाव विकास योजनेंतर्गत निवड झाली आहे. पहिल्या टप्प्यात १४०० कोटी रुपये खर्चाच्या विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. यापैकी सहाशे कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत निवड झालेल्या प्रत्येक गावात २० लाख ३८ हजार रुपये खर्चाची विकास कामे केली जाणार आहेत. अनुसूचित जमातीच्या लोकसंख्या असलेल्या गावांचा आदर्श गाव या संकल्पनेवर आधारित एकात्मिक आर्थिक व सामाजिक विकास करण्यासाठी प्रधानमंत्री आदी आदर्श गाव विकास योजना सुरू करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. ही योजना २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीत राबविली जाणार आहे. निधी मंजूर करण्यात आला असून तो हस्तांतर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या निधी अंतर्गत लाभार्थी गावांना मूलभूत सुविधा व विकास कामे करता येणार आहे.
नंदुरबार प्रकल्प अंतर्गत ३४५ गावांची निवड झाली असून यासाठी साधारणत: सातशे कोटी रुपये खर्चाच्या विकास आराखड्याला मान्यता मिळाली आहे. पैकी तीनशे कोटी रुपये निधी हस्तांतरित करण्यात आला आहे. यात नंदुरबार तालुक्यातील ८९, शहादा तालुक्यातील १११ व नवापूर तालुक्यातील १४५ गावांचा समावेश आहे. तळोदा प्रकल्पांतर्गत ३३३ गावांची निवड झाली असून यासाठी सातशे कोटी रुपये खर्चाच्या विकास आराखड्याला मान्यता मिळाली आहे. पैकी ३०० कोटी रुपये निधी हस्तांतरित करण्यात आला आहे. यात तळोदा तालुक्यातील ७२ गावे, अक्कलकुवा तालुक्यातील १४२ व अक्राणी तालुक्यातील ११९ गावांचा समावेश आहे.