येथील जिल्हा व सत्र न्यायालयात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एम. पठाडे यांनी उद्घाटन केले. यावेळी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एम. वैद्य, दिवाणी न्यायाधीश राहुल शिंदे, न्यायाधीश व्ही. एन. मोरे, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. आर. शेंडगे, न्यायाधीश ए. आर. कलापुरे, न्यायाधीश डी. व्ही. देडिया, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राजेश कुलकर्णी, उपाध्यक्ष ॲड. एस. ए. गिरासे व वकील संघाचे सदस्य उपस्थित होते.
या लोकअदालतीत ९५१ न्यायालयीन प्रलंबित खटले ठेवण्यात आले होते, तर दाखलपूर्व बँक व्यवहारातील दोन हजार ४४९ असे तीन हजार ४०० प्रकरणे ठेवण्यात आले होते. यात एकूण २२५ खटले निकाली निघाले. यात एक कोटी ४० लाख ८८ हजार ६६ रुपये वसूल करण्यात आले. पक्षकारांनी आपसांतील वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दाखवत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
गेल्या दोन वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असलेला संजय ताराचंद चौधरी विरुद्ध आरती राजेश चौधरी यांच्यातील जमीन वाटप, मृत्युपत्र आणि बक्षीस पत्र यासंदर्भातील कायदेशीरदृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीचे आणि किचकट असे प्रकरण दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) राहुल शिंदे यांच्या अध्यक्षीय पॅनलकडे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. न्या. ए. आर. शिंदे यांनी आणि पक्षकारांच्या वतीने काम पाहणाऱ्या ॲड. राजेश कुलकर्णी, ॲड. सरजू चव्हाण व ॲड. स्वर्णसिंग गिरासे यांनी यशस्वी प्रयत्न करून आपसांत तडजोड घडवून आणली. या प्रकरणाची दखल घेऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एम. पठाडे आणि अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एम. वैद्य यांनी या खटल्यातील दोन्ही पक्षकार आणि त्यांच्या वकिलांचा, तसेच दिवाणी न्यायाधीश राहुल शिंदे यांचा सत्कार केला.