मनोज शेलार नंदुुरबार: तालुक्यांतील कुलीडाबर येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळ व पावसामुळे २६ शेळ्यांचा मृत्यू झाला. प्रशासनाने पंचनामा केला असून आमदार राजेश पाडवी यांनी भेट देऊन नुकसानग्रस्तांना दिलासा दिला.
तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावपाड्यात शनिवारी सायंकाळी उशिरा वादळवाऱ्यासह पाऊस झाला होता. या मुसळधार पावसात सापडल्याने शेतात चरत असलेल्या २६ शेळ्यांचा मृत्यू झाला. गावातील पाशा रोडच्या वसावे यांच्या १९, मगन हान्या पाडवी यांच्या ४ तर विजय हुरमा वसावे यांच्या ३ अशा एकूण २६ शेळ्यांच्या मृत्यू झाला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने एकाच वेळी शेळ्यांच्या मृत्यू झाल्याने त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी गावकऱ्यांनी सामूहिक लाकडे एकत्रित करून सरण तयार करून त्यांना अग्निडाग देण्यात आला. नैसर्गिक आपत्तीमुळे पशुपालकांचे मोठे नुकसान झाले. प्रशासनाने पंचनामा केला आहे. आमदार राजेश पाडवी यांनी गावात भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.