लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ऑनलाईन लॉटरी लागल्याचे सांगून असली, ता.धडगाव येथील एकाची तब्बल 27 लाख 10 हजारात फसवणूक झाल्याची घटना घडली. डिसेंबर 2017 ते जून 2018 दरम्यान ही ऑनलाईन फसवणूक झाली.धडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. राज्या पांगल्या तडवी, रा.असली, ता.धडगाव असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तडवी हे शेतकरी व ठेकेदार आहेत. त्यांना 21 डिसेंबर 2017 रोजी रवी मल्होत्रा या नावाच्या व्यक्तीने मोबाईलवर कोन बनेगा करोडपतीची 25 लाख व नंतर 100 कोटी रुपयांची ऑनलाईन लॉटरी लागल्याचे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून राज्या तडवी यांनी मल्होत्रा यांच्या सांगण्याप्रमाणे वेळोवेळी दिलेल्या खात्यात 27 लाख 10 हजार रुपये भरले. डिसेंबर 2017 ते जून 2018 या कालावधीत हा व्यवहार झाला. नंतर आपण फसवले गेल्याचे लक्षात आल्यावर राज्या तडवी यांनी धडगाव पोलीसात फिर्याद दिली. त्यावरून रवी मल्होत्रा या व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक भामरे करीत आहे.
ऑनलाईन लॉटरीच्या अमिषाने धडगावच्या एकाची 27 लाखात फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 7:59 PM