लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पूर्वी चार टक्केचा चा आत असलेला मृत्यूदर आता ५.२८ टक्केपर्यंत गेला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. रविवारी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील पॉझिटिव्ह मृत्यूसंख्या २४ वर गेली आहे. तर दिवसभरात २७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.नंदुरबारात कोरोना रुग्ण वाढत आहेत त्या तशी मृत्यू संख्याही वाढू लागली आहे. यामुळे प्रशासनाचा ताण वाढला आहे. जशी रुग्ण संख्या वाढतेय त्या प्रमाणात रुग्णांकडे होणारे दुर्लक्ष देखील वाढू लागले आहे. सद्य स्थितीत जिल्ह्यात ४५४ रुग्णसंख्या झाली असून मृत्यूची संख्या २४ झाली आहे. एकुण रुग्ण संख्येच्या तुुलनेत मृत्यूसंख्या लक्षात घेता मृत्यूदर हा ५.२८ पर्यंत गेला आहे. तो खान्देशात सर्वाधिक असल्याचे बोलले जात आहे.मृत्यूदर कमी व्हावा यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. परंतु आरोग्य प्रशासन केवळ वेळ मारून नेत असल्याच्या प्रतिक्रिया जनसामान्यांमधून उमटत आहेत.रविवारी दिवसभरात २७ रुग्ण आढळून आले. सर्वाधिक रुग्ण नंदुरबारात आढळले. नंदुरबारात एकुण १५ रुग्ण आढळले. शिवाय दोन जणांचा मृत्यू देखील झाला. त्या खालोखाल शहादा व तळोद्यात रुग्ण आढळून आले.जिल्ह्यात आतापर्यंत एकाच दिवसात ४० पेक्षा जास्त रुग्ण आढळल्याची नों आहे. आता २७ रुग्ण आणि दोन मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. नंदुरबारात आतापर्यंत एकुण रुग्णसंख्या ३०३ झाली आहे. त्यातील १९९ रुग्ण बरे झाले आहेत तर ७९ रुग्ण सद्य स्थितीत उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. या खालोखाल शहादा येथे ११९ रुग्ण आढळून आले असून ५९ बरे झाले आहेत. ५३ जण उपचार घेत आहेत तर ७ जणांचा मृत्यू झाला.
नंदुरबारला कोरोनाचा विळखा एकाच दिवसात २७ अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 12:32 PM