रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कुपोषणाच्या बाबतीत राज्यातच नव्हे तर देशात संवेदनशील माणल्या जणा:या नंदुरबार जिल्ह्यात राज्यातील इतर भागाच्या तुलनेत बालमृत्यूचे प्रमाण घटत असले तरी गेल्या तीन वर्षात दोन हजार 700 बालकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान प्रशासनाकडे बहुतांश बालमृत्यूची नोंदच नसल्याने हा आकडा कागदावरच कमी होत असल्याचा कयास लावला जात आहे.सातपुडय़ातील कुपोषणाचा प्रश्न गेल्या 30 वर्षापासून सातत्याने गाजत आहे. त्यातूनच आकडेवारीचा घोळ, नावालाच राबविण्यात आलेल्या योजना, शिक्षण, आरोग्यातील अनियमितता याबाबतचे वेगवेगळे किस्से समोर आले आहे. अनेक बाबीत सुधारणा झाल्या, काही नवीन प्रयोग राबविण्यात आले. पण प्रयोग यशस्वी झाल्यानंतर काही काळ त्याची चर्चा होते. पुन्हा जैसे थे चित्र असते. त्याबाबतचे सातत्य व यंत्रणेवर नियंत्रण नसल्याने कुपोषणाचे प्रमाण प्रत्यक्षात कमी होत नसल्याचे चित्र आहे. गेल्या तीन वर्षातील बालमृत्यूचे चित्र पाहिल्यास आकडेवारीत घट होत असली तरी आहे ते प्रमाणदेखील चिंताजनक आहे. 2016-17 मध्ये एकूण 970 बालकांचा मृत्यू झाला होता. त्यात 0 ते एक वयोगटातील 773 बालक मृत्यूमुखी पडले. यात ग्रामीण भागातील 400 ते शहरी व संस्थात्मक भागात 337 बालकांचा मृत्यू झाला. तर एक ते सहा वर्ष वयोगटातील 233 बालकांचा मृत्यू झाला. यातही ग्रामीण भागातील 191 बालकांचा मृत्यू झाला. 2017-18 मध्ये एकूण 883 बालकांचा मृत्यू झाला. त्यात शून्य ते एक वयोगटातील 740 तर एक ते सहा वयोगटातील 143 बालकांचा समावेश आहे. यात एकूण ग्रामीण भागातील 479 तर शहरी भागातील 404 बालकांचा मृत्यू झाला.2018-19 मध्ये एकूण 844 बालकांचा मृत्यू झाला. त्यात शून्य ते एक गटातील 708 व एक ते सहा वयोगटातील 136 बालकांचा मृत्यू झाला आहे. यातही ग्रामीण भागातील 426 तर शहरी भागातील 418 बालकांचा मृत्यू झाला आहे.एकूणच या तीन वर्षातील बालमृत्यूचे चित्र पाहिल्यास त्यात सातपुडय़ातील अर्थात धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील प्रमाण अधिक आहे. या दोन्ही तालुक्यात 2016-17 मध्ये 970 पैकी 320 बालकांचा मृत्यू झाला आहे. तर 2017-18 मध्ये 883 पैकी 278 आणि 2018-19 मध्ये 844 पैकी 277 बालकांचा मृत्यू धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात झाले आहे. यातही शून्य ते एक वयोगटातील बालमृत्यूचे प्रमाण लक्षणिय आहे.
जिल्ह्यात तीन वर्षात 2700 बालकांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:38 PM