रमाकांत पाटील, नंदुरबार: जिल्ह्यात यंदा ३० लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध असून त्यासाठी साखर हंगामाची तयारी सुरू झाली आहे. डोकारे कारखान्याचे बॉयलर प्रदीपन झाले असून आयान शुगरचा शुक्रवारी बॉयलर पेटणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात गाळप हंगाम सुरू करण्यासाठी कारखान्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा उसाची लागवड कमी झाली असून यंदाच्या अनियमित पावसाचा फटका ऊस पिकावरही झाला आहे. त्यामुळे यंदा उत्पादन घटण्याचीही शक्यता आहे.
यावर्षी साधारणत: ३० लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध राहणार असून तो गाळप करण्यासाठी डोकारे कारखाना व आयान शुगरने तयारी सुरू केली आहे. सातपुडा साखर कारखानाही यंदा सुरू राहणार असल्याचे संबंधित सूत्रांनी सांगितले. याशिवाय महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या गुजरात व मध्य प्रदेशातील खांडसरी उद्योगही ऊस गाळपासाठी सज्ज झाले आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कारखाने कमी दिवस चालण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी १२० दिवस कारखाने सुरू होते. ते यंदा १०० दिवसापर्यंत सुरू राहतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.