लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालय व रोटरी क्लब नंदुरबारतर्फे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत शून्य ते १८ वयोगटातील १३८ लाभार्थ्यांची हृदयरोग शस्त्रक्रिया पूर्वतपासणी शिबिर घेण्यात आले होते. या वेळी ५१ लाभार्थींची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या फेरीतील २८ लाभार्थींना हृदयरोग शस्त्रक्रियेसाठी एसएमबीटी मेडीकल कॉलेज, धामणगाव (नाशिक) येथे पाठविण्यात आले.रोटरी क्लब नंदुरबार, चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळ नंदुरबार, वेलनेस रिटेल नंदुरबार व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने बालरुग्णांसाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती. पहिल्या फेरीतील २८ लाभार्थींच्या बसला जि.प. उपाध्यक्ष अॅड.राम रघुवंशी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून धामणगाव (नाशिक) येथे शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले. या वेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.के.डी. सातपुते, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे कर्मचारी, अधिकारी, रोटरी क्लबचे डॉ.निर्मल गुजराथी, डॉ.दुर्गेश शाह, वेलनेस रिटेल सेंटरचे विनय श्रॉफ, सुनील चौधरी, यशवंत स्वर्गे, दीपक दिघे, गजेंद्र शिंपी आदी उपस्थित होते. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत शून्य ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते. त्यात अनेक लघु व मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात २२ टीम कार्यरत आहेत.
शस्त्रक्रियेसाठी २८ बालरुग्ण रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 1:06 PM