लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील प्रभाग क्रमांक चार व सात या दोन भागातील कोरोना विषाणू संक्रमित रूग्णांची संख्या लक्षात घेता प्रशासनाच्यावतीने या दोन्ही प्रभागात निर्दिष्ट केलेले दोन कंटेन्मेंट झोन मध्ये एकूण ३० वैद्यकीय पथके कार्यरत करण्यात आले आहेत.या पथकांकडून ३,१३९ कुटुंबातील १७,३२६ नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असल्याची माहिती प्रांत अधिकारी डॉक्टर चेतन गिरासे यांनी दिली. प्रशासनाच्या वतीने दोन्ही कंटेन्मेंट झोन मधील नागरिकांना आवाहन करण्यात येते की आरोग्य तपासणी करताना वैद्यकीय पथकांना सहकार्य करावे कोणतीही माहिती लपवू नये.भाजीपाला विक्री पूर्ववत सुरू करण्यासाठी आज आडत व्यापाऱ्यांसोबत चर्चा करून भाजीपाला मार्केटबाबत नियोजन नगरपालिका प्रशासन मार्फत करण्यात येत आहे. तसेच शेतकरी गटामार्फत घरपोच वितरणासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून नियोजन करण्यात येत आहे.आज सणाच्या पार्श्वभुमीवर खरेदीसाठी काही प्रमाणात झालेली गर्दी चिंताजनक होती. नागरिकांना सुरक्षिततेची आवश्यक काळजी घेताना अनावश्यक बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.दरम्यान, आज तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र पेंढारकर यांनी गरीब नवाज कॉलनीतील मशिदीतून नागरिकांना आवाहन केले, आपल्या परिसरात कोरोना विषाणू संक्रमित रुग्ण आढळून आला असल्याने प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून परिसर निजंर्तुकीकरण करण्यासह प्रभागातील प्रत्येक कुटुंबीयांच्या घरी जाऊन नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे काही माहिती जाणून घेतली जात आहे ही अत्यावश्यक बाब आहे.काही विघ्न संतोषी लोक या मोहिमेला बदनाम करीत असून सीएए व एनआरसी चा सर्वे असल्याचे सांगत आहे. फक्त आपल्या परिसरात रुग्ण आढळत असल्याने ही सर्व खबरदारी घेण्यात येत असून नागरिकांनी याबाबतच्या कुठल्याही अफवेला बळी न पडता आपल्या घरी आलेल्या वैद्यकीय पथकाला खरी माहिती द्यावी व स्वत:सह कुटुंबातील सदस्य व शहराला वाचविण्यासाठी प्रशासनाला साथ द्यावी असे आवाहनही करण्यात आले.
शहाद्यात ३० आरोग्य पथके कार्यरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 2:10 PM