रमाकांत पाटील/नंदुरबार : 2022-23 या आर्थिक वर्षात उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत मोटार वाहन कायद्यातील नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांकडून वायुवेग पथकाद्वारे 4 कोटी 4 लक्ष 63 हजार रक्कम वसुल करण्यात आली आहे.
वायुवेग पथकामार्फत धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे, विना परवाना वाहन चालविणे, ओव्हरलोड वाहतूक, हेल्मेटचा वापर न करणे इत्यादी विविध गुन्हे करणाऱ्या 5 हजार 683 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून उद्दीष्टाच्या तुलनेत ही रक्कम 192 टक्के आहे. नवीन वाहन नोंदणी, एक रकमी कर, मालवाहू वाहनांचा वाहन कर, परवाना शुल्क, अनुज्ञप्ती शुल्क इत्यांदीच्या माध्यमातून 56.17 कोटी जमा झाली आहे. तर सीमा तपासणी नाका, नवापूर येथे आंतरराज्य वाहतूक करणाऱ्या 49 हजार 298 वाहनांकडून 14 कोटी 38 लक्ष रूपये तसेच सीमा तपासणी नाका, गवाली, ता. अक्कलकुवा येथे 23 हजार 151 वाहनांकडून 5 कोटी 40 लक्ष रूपये वाहन कर व दंड या स्वरूपात वसूल करण्यात आले आहे.
वर्ष 2022-23 या आर्थिक वर्षात एकूण 14 हजार 837 नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली, यात 11 हजार 604 दुचाकी, 1 हजार 999 मोटार कार, 373 मालवाहक वाहने, 1 हजार 369 ट्रॅक्टर्स, 153 ट्रेलर्स आणि 144 जेसीबी क्रेन,अॅम्यूलन्स इत्यादी अन्य वाहनांचा समावेश आहे. मागील वर्षीच्या तुलनेत नवीन नोंदणीमध्ये 2 हजार 358 वाहनांची वाढ झाली आहे.