लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणा:या सर्वाधिक 77 गावांपैकी नंदुरबार तालुक्यातील निम्मेपेक्षा अधीक अर्थात 44 गावांचा समावेश आहे. ही सर्व गावे प्रामुख्याने नेहमीच अवर्षण प्रवण राहिलेल्या पूर्व भागातील आहेत. यंदा या गावांमध्ये टंचाई निवारणार्थ 70 लाखांपेक्षा अधीकची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. दरम्यान, जलयुक्तसह इतर जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे या भागात घेवून कायमची टंचाई घालवावी अशी अपेक्षा या भागातील ग्रामस्थांमधून होत आहे.नंदुरबार तालुक्यात यंदा सरासरीचा 90 टक्केपेक्षा अधीक पाऊस झाला आहे. परंतु या पावसाचे प्रमाण हे पश्चिम व उत्तर भागात अधीक आहे. त्यामानाने पूर्व भाग यंदाही कोरडाच राहिला. परतीच्या पावसामुळे थोडाफार दिलासा मिळाला होता. परंतु तोर्पयत पीक हातातून गेले होते, रब्बीला थोडाफार फायदा झाला. परंतु पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम राहिली आहे. हा भाग नेहमीच अवर्षणप्रवण राहिला आहे. यंदाही तीच परिस्थिती राहणार आहे.तब्बल 44 गावेयंदा तालुक्यातील तब्बल 44 गावे टंचाईग्रस्त घोषीत करण्यात आली आहेत. या गावांमध्ये पहिल्या सत्रात खोडसगाव, कोळदे, रनाळे, आडछी, घोटाणे, सातुर्खे व काकर्दे या गावांचा समावेश आहे. द्वितीय सत्रातील उपाययोजनांमध्ये निंबोणी बुद्रूक, वेळावद, लहान शहादा, भालेर, होळतर्फे हवेली, कलमाडी, आराळे, सैताणे, बलवंड, धुळवद, कानळदे, उमर्दे बुद्रूक, खैराळे, घुली, जुने सोनगीर, भादवड, आसाणे, मांजरे, कार्ली, खर्देखुर्द, बह्याणे, रनाळेखुर्द या गावांचा तर तृतीय सत्रात कोठारे दिगर, दहिंदुले बुद्रूक, ढंढाणे, नळवेखुर्द, न्याहली, पळाशी, रजाळे, राकसवाडे, शिंदे, वरूळ, शिंदगव्हाण, तलवाडे बुद्रूक, इंद्रीहट्टी, तिसी, शिवपूर, जुनमोहिदा, ओसर्ली, बामडोद, करणखेडा, वसलाई, पथराई, धमडाई व कोठडा या गावांचा समावेश राहणार आहे. विहिर अधिग्रहण44 गावांमध्ये पहिल्या सत्रात चार गावांमध्ये खाजगी विहिर व कुपनलिका अधिग्रहीत करण्यात आल्या. द्वितीय सत्रात 21 गावांमध्ये विहिरी अधिग्रहीत केल्या जाणार आहेत. तर तृतीय सत्रात देखील 21 गावांमध्ये विहिर व विंधनविहिर अधिग्रहीत केल्या जाणार आहेत. याशिवाय विंधन विहिरींची विशेष दुरूस्ती, विंधन विहिरी घेणे, तात्पुरत्या पुरक नळ योजना आदी कामे घेण्यात येणार आहेत. नेहमीचीच समस्यानंदुरबार तालुक्यातील पूर्व भाग नेहमीच अवर्षण प्रवण राहिला आहे. यंदाही तीच समस्या कायम आहे. त्यामुळे या भागात कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशसनाने गेल्या दोन वर्षापासून या भागात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जास्तीत जास्त गावांची निवड केलेली आहे. यंदा देखील अनेक गावे घेण्यात आलेली आहेत. त्यामुळे येत्या काळात या भागातील चित्र बदलेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याबरोबरच ग्रामस्थांनी देखील पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी उपक्रम राबवावे, जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे देखील आवश्यक आहे. तरच हा भाग अवर्षण प्रवणपासून मुक्ती मिळवेल.सिंचन क्षमता वाढणारतापी-बुराई उपसा योजनेअंतर्गत निंभेल तलावाची साठवण क्षमता 7.05 दशलक्ष घनमीटर, आसाने तलावाची 13.69 दशलक्ष घनमिटर, शनिमांडळ तलावाची 2.07 दशलक्ष घनमीटर तर बुराई प्रकल्पाची 18.66 दशलक्ष घनमिटर इतकी आहे. एकूण साठवण क्षमता 41.47 दशलक्ष घनमिटर इतकी राहणार आहे. कामाअंतर्गत निंभेल व आसाणे येथे साठवण तलाव बांधणे प्रस्तावीत आहे. यामुळे या भागातील पाणी टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. शिवाय शेती सिंचनाची देखील व्यवस्था होणार आहे.
नंदुरबारातील 44 गावे यंदाही टंचाईने होरपळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 11:53 AM