लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमांतर्गत दोन हजार ५६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यातील ४५ अर्ज छाननी अंती बाद ठरवण्यात आले आहेत. गुरुवारी दिवसभरात करण्यात आलेल्या छाननीअंती ही आकडेवारी समोर आली आहे. बुधवारी अंतिम मुदतीत शहादा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींसाठी ६६२, धडगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी ४२६, अक्कलकुवा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीसाठी ३५, तळोदा तालुक्यातील सात ग्रामपंचायतींसाठी १८२, नंदुरबार तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींसाठी ४७३, नवापूर तालुक्यात १४ ग्रामपंचायतींसाठी २८० असे एकूण २ हजार ५६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. या अर्जांची छाननी गुरुवारी सकाळी १० वाजेपासून करण्यात आली. छाननीत तळोदा येथे १ अर्ज अवैध ठरल्याने १८१ अर्ज वैध झाले. अक्कलकुवा येथे २९ अर्ज वैध तर सहा अर्ज अवैध झाले. शहादा येथे १४ अर्ज अवैध ठरुन ६४८ अर्ज वैध ठरले. नंदुरबार येथे ४७३ पैकी १४ अर्ज अवैध ठरल्याने ४५९ अर्ज वैध ठरले. धडगाव येथे ८ जणांचे अर्ज फेटाळण्यात आले. यातून ४०८ अर्ज वैध ठरले. नवापूर येथे २ अर्ज अवैध ठरले तर २८० अर्ज वैध ठरवण्यात आले. रात्री उशिरापर्यंत आकडेवारी जुळवा होत असल्याने निश्चित आकडा समाेर येण्यास उशिर झाला. दरम्यान शुक्रवारपासून माघाराची मुदत सुरु झाली आहे. ४ जानेवारीपर्यंत ही मुदत आहे. त्यानंतर चिन्ह वाटप व प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील ८७ ग्रामपंचायतींच्या एकूण २८३ प्रभागांच्या ६७५ सदस्यपदांच्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी एकूण १ लाख ४६ हजार ५५६ मतदार मतदान करणार आहेत. मतदानाच्या तयारीला प्रशासन लागले असल्याची माहिती आहे. दरम्यान नंदुरबार तालुक्यातील दोन ग्रामपंचायती बिनविरोध होणार असल्याची चर्चा आहे. तिलाली व शनिमांडळ येथे जेवढ्या जागा तेवढेच अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
शहाद्यात तीन ग्रा.प बिनविरोध शहादा तालुक्यातील वर्ढे त. श, हिंगणी व न्यू असलोद या तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याची माहिती आहे. जेवढ्या जागा तेवढेच अर्ज आल्याने बिनविरोध आहेत.