नंदुरबार : सततची नापिकी, यंदाची दुष्काळी स्थिती व बँकेचे कर्ज यामुळे सैताणे येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी नंदुरबार तालुका पोलिसात नोंद करण्यात आली आहे. सैताणे येथील सुदाम गोपीचंद सोनवणे (वय ४९) यांच्या परिवारात पत्नी, दोन मुले, दोन सुना, दोन भाऊ,आई-वडील असा परिवार आहे. त्यांची बलवंड शिवारातील आठ एकर शेती आहे.
यावर्षी शेतीच्या भांडवलासाठी घेतलेले पीक कर्ज, यंदाची दुष्काळी स्थिती नेहमीच पीक उत्पादनातील अनियमितता यामुळे कुटूंबाचा गाडा चालविणे कठीण होत होते. पाऊस नाही, शेताजवळून गेलेल्या अमरावती नाल्याला देखील पाणी नाही, त्यामुळे पेरणी केलेले पीक वाया जाण्याची भिती त्यांना होती. दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर वाढत असल्याने ते नैराश्येत होते. त्यातूनच त्यांनी शुक्रवारी शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत यशवंत सुदाम पाटील यांनी नंदुरबार तालुका पोलिसात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.