लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्ट्रवादी कॅांग्रेसतर्फे स्वाभिमान सप्ताह साजरा करण्यात येणार असून त्याअंतर्गत पक्षाच्या ८१ शाखांचे उद्घाटन करून ५०१ रक्तदान बॅगांचे संकलन केले जाणार आहे. दरम्यान, मुंबई येथे होणारा अभिष्टचिंतन सोहळाचे थेट प्रेक्षेपण नाट्यगृहासह त्या त्या तालुकास्तरावर केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॅा.अभिजीत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवासानिमित्त १२ डिसेंबरपासून स्वाभिमान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त आयोजित विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी आमदार उदेसिंग पाडवी व पदाधिकारी उपस्थित होते. मोरे यांनी सांगितले, जिल्ह्यात राष्ट्रवादीतर्फे आठवडाभर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यात रक्तदान शिबिरे घेण्यात येणार आहेत. जिल्हाभरातून ५०१ रक्तबॅगांचे संकलन केले जाणार आहे. सद्या जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा असून तो या माध्यमातून भरून घेतला जाणार आहे. पक्ष वाढीसाठी देखील उपक्रम घेण्यात येणार आहे. सप्ताहात तब्बल ८१ ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष शाखेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याशिवाय तीन हजार जणांना आरोग्य किट वाटप केेले जाणार आहेत. याशिवाय स्थानिक पातळीवर इतरही विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा हा मुंबई येथे होणार आहे. त्या सोहळ्याला कोरोनामुळे मोजक्याच लोकांना प्रवेश राहणार आहे. त्यामुळे त्याचे थेट प्रेक्षेपण करण्यात येणार आहे. नंदुरबारातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात एलईडी लावण्यात येणार आहे. याशिवाय त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी देखील बंदीस्त सभागृहांमध्ये एलईडीद्वारे प्रेक्षेपण केले जाणार असल्याची माहिती अभिजीत मोरे यांनी दिली.
स्वाभिमान सप्ताहात ५०१ बॅगा रक्त संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 1:16 PM