लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनानंतरच्या अनेक आजारांना सध्या ६० पेक्षा अधिकजण विविध रुग्णालयांमध्ये तोंड देत असल्याचे चित्र आहे. तोंडाचे आजार, सांधेदुखी, फुफ्फुसावरील उपचार, श्वसनाचा त्रास यासह इतर आजारांचा समावेश आहे. सर्वाधिक त्रास हा ज्येष्ठांना झाला असल्याचे दिसून येत आहे. शिवाय ज्यांचे वजन जास्त अर्थात स्थूल व्यक्तींनाही हा त्रास जाणवत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कोरोनावर यशस्वी मात करून आलेल्या अनेक रुग्णांना औषधांचा जादा डोस, रेमडेसिविरचे अधिकचे इंजेक्शन यामुळे त्रास जाणवत असतो. सर्वाधिक त्रास हा दम लागणे, सांधेदुखी, वजन कमी होणे यासह तोंडाचे आजार यात म्युकरमायकोसिससदृश आजारांचादेखील समावेश आहे. काहींची शुगर वाढल्याने त्यांना आता शुगर अर्थात मधुमेहाचे उपचार घ्यावे लागत असल्याचेही चित्र आहे. अशा विविध आजारांमुळे कोरोनामधून बरे झालेल्या अनेकांना विविध रुग्णालयांमध्ये राहून किंवा नियमित उपचार घ्यावे लागत आहे. या सर्वांमध्ये ६० वर्षे वयापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश आहे.
पोस्ट कोविडच्या सर्वाधिक धोक्याच्या कक्षेत ज्येष्ठ मंडळी...
पोस्ट कोविडचा सर्वाधिक धोका हा ज्येष्ठ व्यक्तींना आहे. अशा लोकांची प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने व विविध आजार यापूर्वीच राहत असल्यामुळे पोस्ट कोविड अशा वयोगटातील लोकांना सर्वाधिक असतो. गेल्या दीड वर्षात या बाबी सर्वाधिक दिसून आल्या आहेत. त्यामुळे अशा ज्येष्ठांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी नियमित फिरणे, हलका व्यायाम, योगासने करणे गरजेचे आहे. ज्येष्ठांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जाणे टाळावे, जास्त लोकांच्या संपर्कात कमी राहावे. बस किंवा गर्दीच्या वाहनातून प्रवास करू नये.
कोरोनातून बरा, परंतु श्वसनाचा त्रास
n कोरोनातून बरे झालेल्या अनेकांना आता श्वसनाचा त्रास होत आहे. कोरोनाचा सर्वात मोठा अटॅक हा श्वसन यंत्रणवेर झाला होता. अर्थात अनेकांना फुफ्फुसावर ताण आला होता.
n ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेले बहुतेकजण श्वसनाच्या त्रासाला वैतागले आहेत. जीना चढणे, जास्त वेळ चालणे किंवा जास्त वेळ उभे राहून काम केल्यावर धाप लागत आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी डॅाक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार घेणे सोयीस्कर आहे.