नंदुरबार : संत दगा महाराज प्रेरित अखंड रामधून कार्यक्रमासाठी नंदुरबार जिल्ह्यातून मालसर, जि.बडोदा येथे गेलेले ६५ भाविक नर्मदा नदीला अचानक पूर आल्याने अडकले आहेत. या भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी गुजरात प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, सरदार सरोवर प्रकल्प तुडुंब भरला असून प्रकल्पाचे २७ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
मालसर, जि.बडोदा येथे नर्मदा काठावर पंचमुखी हनुमान मंदिर आहे. तेथेच दुमजली आश्रमाची इमारत आहे. याठिकाणी गेल्या २२ दिवसांपासून जिल्ह्यातील ६५ भाविक अखंड रामधून कार्यक्रमासाठी गेले होते. हे रामधून सुरू असतानाच रविवारी सकाळी अचानक नर्मदेची पाण्याची पातळी वाढली. सकाळी १० वाजेच्या सुमारास काही भाविक रामधून करीत होते तर काही भाविक जेवणाची तयारी करीत होते. ही लगबग सुरू असतानाच ज्याठिकाणी रामधून सुरू होते तेथे गुडघ्याएवढे पाणी आले. त्याच स्थितीत भाविकांनी कलश उचलून दुसऱ्या मजल्यावर स्थलांतरित झाले व तेथे रामधून सुरू केले. दरम्यान, दिवसभरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाण्याची पातळी सातत्याने वाढत जाऊन आश्रमाच्या इमारतीचा पहिला मजला पाण्याखाली बुडाला. त्यामुळे भाविक भयभीत झाले. याबाबत गुजरात प्रशासनाकडे माहिती दिल्यानंतर बडोदाचे जिल्हाधिकारी त्या घटनेवर स्वत: लक्ष घालून असून तेथील भाविकांशी त्यांनी संपर्क साधून त्यांना बाहेर काढण्याची व्यवस्था प्रशासन करीत असल्याची सूचना दिली. तसेच सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात राहण्याचेही त्यांनी सांगितले.
सरदार सरोवर प्रकल्प तुडुंबसरदार सरोवर प्रकल्प रविवारी तुडुंब भरला आहे. धरणाची उंची १३८.६८ मीटर असून याठिकाणी दुपारी दोन वाजता पाण्याची पातळी १३८.६८ मीटर झाली होती. धरणाचे २७ दरवाजे उघडण्य