लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात लसिकरणासाठी ७५ कोल्ड चेन पॅाईंट्स राहणार आहेत. लसिकरणाची सर्व तयारी पारदर्शकपणे करावी तसेच कोरोना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना आखाव्या असे निर्देश पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी कोरोना आढावा बैठकीत बोलतांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष ॲड. सीमा वळवी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविश्यांत पांडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके आदी उपस्थित होते. ॲड. पाडवी म्हणाले, कोरोनाबाधितांची संख्या अधिक असणाऱ्या गावात संचारबंदीचे कठोरतेने पालन करावे. लग्नसमारंभात मार्गदर्शक सूचनांचे पालन न करणारे आणि मास्क न घालणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई करण्यात यावी. कोरोनाबाधिकांच्या संपर्क साखळीचा शोध घेण्यावर विशेष भर देण्यात यावा. कलमाडीसारख्या अधिक कोरोनाबाधित आढळणाऱ्या गावात विशेष उपाययोजना कराव्यात.गृहविलगीकरणात राहणारे बाधित इतरांच्या संपर्कात येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. कोरोनाबाधित घराबाहेर आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. नागरिक कोरोनाविषयक सूचनांचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास आल्यास त्या भागात संचारबंदीची कठोरतेने अंमलबजावणी करावी. कोविड केअर सेंटरमधील सुविधांच्या दर्जाबाबत अधिकाऱ्यांनी सातत्याने तपासणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.नंदुरबार येथे एमआरआय स्कॅन व तळोदा येथे लहान ऑक्सिजन यंत्रणा सुरू करण्याबाबत प्रस्ताव तयार करावा, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात एकूण कोरोना चाचण्यांपैकी आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या अधिक असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. कोरोनाबाधित आढळणाऱ्या भागातील चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी कोरोना नियंत्रणात आणण्याबाबत प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. जिल्ह्यात आतापर्यंत ८४३१ कोरोनाबाधित आढळले असून, त्यातील ७६१७ बरे झाले आहेत. रुग्ण दुप्पट होण्याचा दर १३३ असून बरे होण्याचा दर ९१.८२ तर मृत्युदर २.१ टक्के आहे. डिसेंबर महिन्यात १२१५ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला, तर त्यातील १००८ बरे झाले. कोरोना लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यात ९४८० शासकीय आणि २३८० खासगी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार असून, १०,०८७ व्यक्तींची माहिती ॲपवर अपलोड करण्यात आली आहे. जिल्ह्यात लसीकरणासाठी एकूण ७५ कोल्ड चेन पॉइंट्स असणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
अफ्रिकेतील शिखर सर करण्यासाठी तीन लाख... एव्हरेस्टवीर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आनंद बनसोडे यांच्या टीमसोबत आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर किलो मांजरो या शिखरावर ३६० एक्स्प्लोर्सच्या वतीने चढाई करण्याकरिता अक्कलकुवा तालुक्यातील बालाघाटच्या अनिल वसावेची निवड झाल्याने त्याला पुढील तयारीसाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड .के.सी.पाडवी यांच्या हस्ते तीन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. अतिदुर्गम भागात राहणाऱ्या अनिलला गरिबीच्या परिस्थितीमुळे मोहिमेवर जाणे शक्य नव्हते. ही बाब पालकमंत्री पाडवी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने मदत देण्याबाबत आदिवासी विकास विभागाला सूचना दिल्या. प्रकल्प कार्यालयातर्फे न्यूक्लिअस बजेट योजनेंतर्गत तत्काळ कार्यवाही करण्यात आली व पुढील मोहिमेसाठी आवश्यक मदत अनिलला देण्यात आली. आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर किलो मांजरो चढाई करण्याकरिता विविध स्पर्धामधून दहा गिर्यारोहकांची निवड करण्यात आली आहे. ही टीम २० जानेवारी रोजी मोहिमेला सुरुवात करुन २६ जानेवारीला भारताचा तिरंगा झेडा तेथे फडकविणार आहे. अनिलने मोहीम यशस्वी करीत जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा व यापुढेही असेच यश संपादन करावे, अशा शुभेच्छा पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. अनिल वसावे याने शासन तसेच प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत.