तळोदा : गेल्या वर्षभरात जिल्ह्यातून पावणे सहाशे कुष्ठरोगाचे रुग्ण आढळून आले असून, त्यातील 82 रुग्ण उपचाराने पूर्णपणे बरे झाले आहेत. दरम्यान, शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या महाराजस्व मेळाव्यात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते त्यातील 30 रुग्णांना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले.जिल्हा कुष्ठरोग नियंत्रण आरोग्य विभागामार्फत नंदुरबार जिल्ह्यात गेल्या वर्षी कुष्ठरोगाच्या रूग्णांचे सव्रेक्षण करण्यात आले होते. गेल्या वर्षभरात संपूर्ण जिल्ह्यातून साधारण 575 रुग्ण आढळून आले आहेत. या सर्वावर या यंत्रणेमार्फत उपचार सुरू आहेत. संबंधीत यंत्रणेकडून पुरेसा औषधोपचार मिळाल्यानंतर त्यातील 82 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान यातील 30 रुग्णांना गेल्या शनिवारी तळोदा येथील वामनराव संकुलामध्ये विधी सेवा प्राधिकरणामार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाराजस्व मेळाव्यात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.एम. बोर्डे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे. या वेळी जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा सत्र न्यायाधिश अभय वाघवसे, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे संजय यादव, न्यायाधिश एस.टी. मलिये, कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक डॉ.प्रिती पटेल, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील आदींसह या विभागातील कर्मचारी उपस्थित होते.जिल्ह्यातील कुष्ठरोगाच्या रूग्णांना या यंत्रणेकडून प्रमाणपत्र देण्यात आल्यानंतर या रुग्णांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कुष्ठरोग्यांसाठी शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा आवास घरकुल योजना, मोफत बस प्रवास अशा वेगवेगळ्या योजनांचा लाभ देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. तथापि संबंधीत यंत्रणांच्या उदासिन धोरणांचा फटका त्यांना बसत असल्याचा आरोप आहे. कारण त्यांनी सातत्याने मागणी करूनही याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचे म्हणणे आहे. आधीच कुष्ठ रोगीच्या रुग्णांबाबत समाजामध्ये नकारात्मक दृष्टीकोनाची भावना आहे. त्यामुळे असे रुग्ण माहितीसाठी पुढे येत नाही. साहजिकच त्यांना प्रशासनानेच मदत देण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. जिल्हा कुष्ठरोग कार्यालयातर्फेदेखील तळोदा, शहादा व अक्कलकुवा तालुक्यातील साधारण 250 रुग्णांचे संजय गांधी निराधार योजना, घरकुले व मोफत प्रवास सवलतीसाठी प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. त्याबाबत तत्कालीन महसूल प्रशासनाशीदेखील संबंधीत यंत्रणेने चर्चा केली होती. त्याबाबत स्वतंत्र बैठकही घेण्याचे आश्वासन महसूल प्रशासनाने दिले होते. मात्र आजतागायत त्यावर कार्यवाही झालेली नसल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी संबंधीत यंत्रणा व जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून या रुग्णांना तातडीने शासकीय मदत मिळवून देण्याची मागणी केली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील 82 कुष्ठरोगी रोगमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 12:25 PM