लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील देसाईपुरा भागातील घर बांधकामाचा ठेका घेऊनही काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश खंडू चाैधरी (रा. देसाईपुरा, कुंभारी गल्ली) यांनी नितीन प्रकाश जेठे (५५, रा. शिवाजी रोड) याला जून २०१९ मध्ये दुमजली घर बांधकामाचे कंत्राट दिले होते.
वाजवी दरात उत्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरून घर बांधकाम करण्याचा करार झाला होता. यापोटी नितीन जेठे याला काही रक्कमही देण्यात आली होती. दरम्यान, प्रारंभी सुरू केलेल्या कामात सर्व निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून संबंधिताकडून काम करण्यात आले. याबाबत योगेश चाैधरी यांनी तक्रार केल्यानंतर सुधारणा करून शिल्लक असलेले बांधकाम पूर्ण करून देण्याचे आश्वासन देत नितीन जेठे याने दाेन लाख रुपये घेतले होते.
जून २०१९ ते २०२२ दरम्यान मात्र कोणतेही काम न करता बांधकाम अपूर्ण ठेवल्याने योगेश चाैधरी यांना नुकसान झाले होते. याप्रकरणी त्यांनी नंदुरबार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे दाद मागितली होती. न्यायालयाने त्यांचा अर्ज मंजूर करून पोलीसांना संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. योगेश चाैधरी यांच्या फिर्यादीवरून संशयित ठेकेदार नितीन जेठे (५५) याच्याविरोधात नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तपास पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर करत आहेत.