नंदुरबार : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी भाजप उमेदवार खासदार डॉ. हीना गावित यांच्या मोबाइल नंबरचा वापर करून बनावट कॉल केल्याप्रकरणी अखेर नंदुरबार तालुका पोलिसात फिर्याद दाखल झाली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कोपर्ली, ता. नंदुरबार येथील विनोद रमण वानखेडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, १३ मे रोजी सकाळी साडेआठ वाजता आपल्या मोबाइल नंबरमध्ये (०९२२८८७५६३) सेव्ह असलेल्या खासदार डॉ. हीना गावित या नावाने सेव्ह असलेल्या (९९६७०४५६०७) या मोबाइल नंबरवरून एक बनावट कॉल आला. तो खरा असल्याचे भासवून मतदारांची व कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत आपण शहानिशा केली असता तो कॉल डॉ. हीना गावित यांच्या नंबरवरून झाला नसल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे कुणीतरी त्या नंबरचा वापर करून बनावट काॅल करून मतदार व कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे वानखेडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलिसात सायबर क्राईम, लोकप्रतिनिधी कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड करीत आहे.