नंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागातील मोलगी ता. अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या गर्भवती मातेला उपचार न दिल्याने तिच्यासह पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याची घटना ८ मार्च रोजी घडली होती. याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवालात ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे माता आणि पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी शनिवारी रात्री उशिरा डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मोनिका लालसिंग वळवी (२२)रा.दहेलचा ईऱ्याआडीपाडा ता.अक्कलकुवा असे मयत मातेचे नाव आहे. मोनिका यांना ८ मार्च रोजी दुपारी चारवाजेच्या सुमारास त्यांचे पती लालसिंग वळवी व कुटूंबियांनी मोलगी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.
मोनिका ह्या आठ महिन्याच्या गर्भवती असल्याने त्यांना तातडीने उपचारांची आवश्यकता होती. परंतू ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल विठ्ठल लांबोळे यांनी तिच्यावर उपचार केले नाहीत. परिणामी माता आणि तिच्या पोटातील बाळ अशा दोघांचाही मृत्यू झाला होता. दरम्यान याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक चारुदत्त शिंदे यांनी चौकशी तज्ज्ञ समिती नियुक्त केली होती. समितीने चौकशी केल्यानंतर मयत मोनिका आणि त्यांच्या पोटातील बाळाचा जीव वाचवणे शक्य असतानाही राहुल लांबोळे यांनी उपचार न दिल्याने मातेचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. हा अहवाल समितीने जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिल्यानंतर पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. याप्रकरणी पोलीस हवालदार राजेंद्र गावीत यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित राहुल विठ्ठल लांबोळे (४५) याच्याविरोधात मोलगी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप आराक करत आहेत.