मनोज शेलार/नंदुरबार
नंदुरबार : लाल मिरचीचा ठसका कायम असून, नंदुरबार बाजार समितीत कोरड्या लाल मिरचीची गुरुवारी तब्बल ३३ हजार ८०० रुपये क्विंटलने विक्री झाली. आतापर्यंतचा हा सर्वाधिक भाव असल्याचे बाजार समितीने स्पष्ट केले. नंदुरबारचे लाल मिरचीचे मार्केट प्रसिद्ध आहे. दरवर्षी अडीच ते तीन लाख क्विंटल ओल्या मिरचीची आवक येथील बाजार समितीत होते. यंदादेखील साडेतीन लाख क्विंटलपर्यंत मिरचीची खरेदी झाली आहे. आता ओली मिरचीची आवक कमी झाली असून, कोरडी मिरचीची आवक सुरू झाली आहे.
गुरुवारी कोरड्या लाल मिरचीला तब्बल ३३ हजार ८०० रुपये क्विंटल भाव मिळाला. वेळदा येथील शेतकऱ्याच्या मिरचीला हा भाव मिळाला आहे. कोरड्या लाल मिरचीच्या प्रतवारीनुसार सरासरी ३२ हजार ते ३३ हजार ८०० रुपये क्विंटल भाव मिळत असल्याचे बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी सांगितले.दरम्यान, येत्या काळात कोरड्या लाल मिरचीचा आणखी भाव वाढण्याची शक्यता आहे.