नंदुरबार : जुन्या पेन्शनसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचारी संपावर आहेत. यात राज्यभरातील जिल्हा रुग्णालयात काम करणारे चतुर्थ श्रेणी कर्मचारीही आहेत; परंतु नंदुरबार जिल्ह्यात मात्र याउलट स्थिती असून, जिल्हा रुग्णालयातील जुनी पेन्शनची मागणी करणारे कर्मचारी काळी फीत लावून काम करत आहेत. यातही शवविच्छेदक असलेला कर्मचारी वेगळा ठरला असून, काळी लावत दोन दिवसांत आठ जणांचे शवविच्छेदन करून सेवा हा धर्म पाळत त्याने एक आदर्श निर्माण केला आहे.
विजय साळुंखे असे शवविच्छेदकाचे नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा रुग्णालयात काम करणारे विजय साळुंखे हेही मंगळवारपासून पुकारण्यात आलेल्या जुनी पेन्शन लागू करण्यासाठीच्या बेमुदत संपात सहभागी झाले आहेत; परंतु आपण संपात गेलो तर, मृतदेहांचे शवविच्छेदन करून सेवा कोण देणार, या विचाराने त्यांनीही संघटनेच्या निर्णयात सहभाग नोंदवत काळी फीत लावून संप स्वीकारला आहे. काळी फीत लावून त्यांनी मंगळवारी आणि बुधवारी प्रत्येकी चार मृतदेहांचे शवविच्छेदन केले आहे.
ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत थकवणारी असतानाही दोन दिवसांपासून ते त्या कामात आहेत. प्रत्येक मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर घेतलेल्या नोंदीचा अहवाल हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना देत आहेत. बुधवारी त्यांनी अतिमद्यसेवन, विषप्राशन, गळफास आणि अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे शवविच्छेदन केले. संप पुढेही सुरू राहिला तरीही आपण स्वीकारलेले सेवेचे व्रत पुढे सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.