मनोज शेलार/नंदुरबार
नंदुरबार : गावातील एका महिलेला जादूटोणा करून मारून टाकल्याचा आरोप करीत महिलेचे हातपाय बांधून तिला स्मशानभूमीत फिरवून चौघांनी मारहाण केल्याची घटना डाबचा कुकरखाडीपाडा, ता.अक्कलकुवा येथे घडली. याप्रकरणी तीन महिलांसह चौघांविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये मोलगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, कुकरखाडीपाडा येथील मोकन्या खेमा वसावे यांची बहिण वज्याबाई बोख्या पाडवी या महिलेचा काही दिवसापूर्वी मृत्यू झाला होता. वज्याबाई या महिलेला गावातीलच चमारीबाई होमा पाडवी (४०) या महिलेने जादूटोणा करून डाकीण बनून मारून टाकले असा समज मोकन्या वसावे व त्याच्या कुटूंबियांनी करून घेतला. त्यामुळे मोकन्या याच्यासह हुवलाबाई मोकन्या वसावे, वंती खेमा वसावे, रायकीबाई दिवाल्या वसावे सर्व रा. कुकरखाडीपाडा यांनी चमारीबाई पाडवी यांना घरून ओढत आणून स्मशानात नेले. तेथे दोन्ही हात दोरीने बांधून स्मशानभुमीस फेरी मारायला लावली व शपथ घेण्यास भाग पाडले. त्यांनी चौघांनी काठीने व दोरीने बेदम मारहाण केली. त्यांच्यापासून सुटका झाल्यानंतर चमारीबाई यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. तेथे आपबिती सांगितल्यानंतर पोलिसांनी चौघांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक अन्साराम आगरकर करीत आहे.