लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : खेलो इंडीया स्पर्धेत अॅथलेटिक्स क्रीडा उंचउडी प्रकारात २.७ मीटर एवढी उंचउडी मारत अभय गुरव याने खेलो इंडीया स्पर्धेतील सर्व रेकॉर्ड मोडीत काढत सुवर्ण पदकावर नाव कोरले. त्यामुळे नंदुरबार तालुका विधायक समितीचे उपाध्यक्ष मनोज रघुवंशी यांच्या हस्ते गुरव याचा सन्मान करण्यात आला.यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात खेलो इंडीया स्पर्धेत सुवर्ण पदकावर नाव कोरणारा खेळाडू अभय भटू गुरव याचा सन्मान सोहळा झाला. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक संघाचे सचिव पुष्पेंद्र रघुवंशी, प्राचार्य शिवाजी पाटील, मुख्याध्यापक सुनील पाटील, प्रा.डी.एस. नाईक, क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी, सचिव मीनल वळवी, प्रा.डॉ.मयुर ठाकरे, अनिल रौंदळ, प्रविण पाटील, जगदीश वंजारी आदी उपस्थित होते.याप्रसंगी मनोज रघुवंशी यांनी खेळाच्या माध्यमातून अभय गुरव याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असल्याचे नमूद करीत त्याचा आदर्श नवोदीत खेळाडूंनी घ्यावा, असे प्रतिपादन केले. या वेळी अभयने मनोगतात सांगितले की, मला यशवंत विद्यालयात घेतलेल्या प्रवेशामुळे क्रीडा क्षेत्रातील संधी मिळाली असून हे मी विसणार नाही. तसेच याठिकाणी मला जे मार्गदर्शन मिळाले, यातूनच मी राष्ट्रीय पदक विजेता ठरलो आहे. त्यामुळे सर्व मुला-मुलींनी कुठल्याही खेळात जिद्द व चिकाटी ठेवून सहभाग नोंदविण्याचा संदेश दिला.कार्यक्रमासाठी प्रा.एन.एस. पाटील, प्रा.राजेंद्र शेवाळे, प्रा.वाय.डी. चौधरी, प्रा.पंकज पाटील, प्रा.संजय मराठे, प्रा.आरती तंवर, प्रा.जयश्री भामरे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शैलेंद्र पाटील यांनी केले.
यशवंत विद्यालयात अभय गुरवचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 1:06 PM