लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : चोरीच्या गुन्ह्यातील 15 वर्षापासून फरार आरोपीस पकडण्यासाठी पोलीस कर्मचा:यांनी मजुर म्हणून काम करून त्याच्या मुसक्या आवळल्या. गुजरात मधील वाकानेर येथील स्टाईल फॅक्टरीतून या चोरटय़ास अटक करून आणण्यात आले. गंगाराम उर्फ टेबल्या गुज:या बारेला-डावर, रा. फुलजवारी, ता.निवाली, जि.बडवाणी असे संशयीत आरोपीचे नाव आहे. दिनेश प्रेमजी पटेल यांच्या कुपनलिकेच्या गाडीवर तो कामाला होता. आचपा, ता.धडगाव येथे 4 मे 2005 रोजी कुपनलिकेच्या कामासाठी गाडी गेली होती. गाडीमध्ये असलेल्या लोखंडी पेटीचे कुलूप तोडून गंगाराम याने दोन लाख 25 हजार रुपये चोरून पोबारा केला होता. याबाबत धडगाव पोलिसात चोरीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्या दिवसापासून गंगाराम हा फरार होता. त्या घटनेला 15 वर्ष झाले होते. गुन्हे अन्वेशन शाखेने फरार आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली असता या आरोपीबाबत पथकाला माहिती मिळाली. गुजरातमधील मोरवी जिल्ह्यातील वाकानेर येथे एका टाईल्स फॅक्टरीत मुकडम म्हणून गंगाराम उर्फ टेबल्या बारेला काम करीत असल्याचे निष्पन्न झाले. संशयीत हा मुळचा मध्य प्रदेशातील राहणारा, चोरीचा गुन्हा महाराष्ट्रात केलेला आणि पळून गेला गुजरात राज्यात. अशी सर्व परिस्थिती होती. त्याची ओळख पटविण्याची मोठी कसरत पोलिसांपुढे होती. त्यामुळे एलसीबीच्या पथकातील काही जणांनी त्या फॅक्टरीत दोन ते तीन दिवस स्वत: मजुर म्हणून कामाला सुरुवात केली. या दरम्यान गंगाराम हा संशयीत निष्पन्न झाल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळल्या. पथकाने त्याला ताब्यात घेवून धडगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे वरिष्ठ निरिक्षक किशोर नवले, कर्मचारी प्रदीप राजपूत, किरण पावरा, मोहन ढमढेरे, तुषार पाटील, विकास पाटील यांनी केली.
फरार आरोपीच्या पोलिसांनी गुजरातमध्ये मजूरीचे काम करून आवळल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 12:57 PM