नंदूरबार : राज्य शासनाने आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने शाळांना पत्र देत समित्या गठित करून गुरुवारपासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. बुधवारी दिवसभर या आदेशाची अंमलबजावणी सुरू होती. यातून दिवसभरात शाळांची साफसफाई करण्यावर भर दिला जात होता.
शहरी आणि ग्रामीण भागात एकूण ३३९ शाळा व कनिष्ठ महाविद्यालये गुरुवारपासून सुरू होणार आहेत. तत्पूर्वी, मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनात गावोगावी बैठका घेण्यात येऊन माहिती देण्यात आली. ज्या गावामध्ये शाळा व कनिष्ठ महाविद्यालये आहेत, तेथील बहुतांश पालक, ग्रामपंचायत पदाधिकारी व गावातील ज्येष्ठ यांनी शाळा सुरू करण्याबाबत संमती दिली असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. शिक्षकांकडूनही तयारी सुरू करण्यात आली असून, गुरुवारी सकाळी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना सुरक्षा उपायांसह शाळेत बसवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.